मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण

मेहकर : बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत मेहकर येथील गाभणे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात घुसून ज्युनियर डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण जाधव आपल्या मित्रांसह गाभणे हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले. मात्र, रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टरने मध्यरात्री भेटीची वेळ नसल्याचे आणि रुग्णांना आरामाची गरज असल्याचे सांगत केवळ एक-दोन व्यक्तींनाच भेटण्याची परवानगी दिली. यावर संतापलेल्या जाधवने सर्वांना एकाच वेळी ICU मध्ये जाण्याचा आग्रह धरला आणि डॉक्टरशी वाद घालत त्याला जबर मारहाण केली.
ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, लक्ष्मण जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.





