मेघालयातून पाच वर्षात 412 कोटींचे ड्रग्ज जप्त; गिरी प्रसाद यांनी दिली माहिती

शिलॉंग : गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत मेघालयमध्ये ४१२ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे आमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ड्रग्स तस्करीच्या संदर्भात १ हजारांपेक्षा अधिक तस्करांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे प्रभारी पोलीस अधिक्षक गिरी प्रसाद यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना दिली.
आमली पदार्थ विरोधी विभागाने २०२० ते २०२५ दरम्यान, दल आणि राज्य पोलिसांनी ४००,९९३ ग्रॅम हेरॉइन, १२,७५६ किलो गांजा, २,७९,६३६ किलो अफू, ७६ किलो याबा गोळ्या, १४ किलो व्हाईट क्रिस्टल मेथ आणि १,२४,९०६ बाटल्या कोडीन कफ सिरप जप्त केले. या जप्त केलेल्या आमली पदार्थांची किंमत ही ४१२ कोटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यातील निम्म्या अमली पदार्थांची कायदेशीर प्रक्रियेद्वारे विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत, ड्रग्ज तस्करीच्या संदर्भात १,०६१ लोकांना अटक करण्यात आली आहे आणि ६०३ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
मेघालय सरकारने गुरुवारी जैंतिया हिल्स पूर्व जिल्ह्यात ४ कोटी रुपयांच्या आमली पदार्थांची खेप पकडली होती. या जप्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या एएनटीएफच्या आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार समाज कल्याण मंत्री पॉल लिंगडोह यांच्या हस्ते करण्यात आला.



