Drugs Seized – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली. यावेळी कुसगाव परिसरातून २ लाख ६० हजार ९०० रुपये किमतीची एमडी (मेफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. कुसगाव येथील रेल्वेच्या मोकळ्या जागेत काही व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून योगेश उर्फ सन्नी उर्फ गोगो दुर्योधन उमक (वय २४, रा. कुसगाव, लोणावळा) आणि रिझवान अली नंदकुंद सिद्दीकी (वय २७, रा. कामत रूम, लोणावळा) यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून २६.०९ ग्रॅम वजनाची एमडी पावडर, तसेच २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ८० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या विक्री आणि सेवनाच्या उद्देशाने अमली पदार्थ जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, हनुमंत पासलकर, सागर नामदास, तुषार भोईटे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.