प्रभात वृत्तसेवा पुणे – नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ६ हजार ९०० बंदी असलेल्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी स्वारगेटमधील जेधे चौकात करण्यात आली. समीर हमीद शेख (४० , कोंढवा ) आणि सुनिल गजानन शर्मा (३४,रा.कोंढवा) यांना अटक झाली असून समीरवर अगोदरच फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना गोळ्या विक्रीसाठी दोन व्यक्ती दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दुचाकी अडवली. तपासात डिक्कीत गोळ्याची पाकीटे आढळली. अधिक चौकशीत कोंढव्यातील घरात अधिक साठा असल्याचे कळल्यावर तेथे छापा टाकत नेट्रोझेपाम, नित्झासेन १०, अल्प्राझोलाम ०.५ निट्राफास्ट आदी प्रकारच्या ६ हजार ९०० गोळ्या ताब्यात घेतल्या. अटकेतील दोघेही दोघेही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवानगीशिवाय गोळ्यांची विक्री करत होते. या गोळ्या मुख्यतः कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प आणि येरवडा परिसरात नशेच्या वापरासाठी विकल्या जात होत्या. खडक पोलिसांनी आरोपींवर एनडीपीएस कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, कुलदीप व्हटकर, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, विकास पांडोळे, विधिन केदारी, शोएब शेख, निलेश दिवटे, मयुर काळे, युवराज नाइकरे यांच्या पथकाने केली. नशेसाठी वापर जप्त गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात होता. या गोळ्या काही आजारांमध्ये झोप न येणाऱ्या रुग्णांसाठी किंवा रुग्णांना पुरेशी झोप मिळून आराम मिळण्यासाठी देतात.या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय विकण्यास बंदी आहे. गोळ्यांमध्ये अंमली पदार्थाचा अंश असल्याने त्याची विक्री गुन्हा आहे.