ठाणे : महाराष्ट्र पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थानच्या झुंझुनू येथे धडक कारवाई करत अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उद्ध्वत केला आहे. या कारवाईत सुमारे १०० कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ, रसायने आणि उपकरणे जप्त केली आहेत. मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी केलेल्या छाप्यानंतर अंमली पदार्थांच्या कारखान्यातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ४ ऑक्टोबर रोजी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या शोध मोहिमेनंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात केलेल्या कारवाईत १ कोटी रुपये किमतीचे ५०१.६ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), आठ मोबाईल फोन आणि दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या होत्या. त्यावेळी सहा जणांना अटकही करण्यात आली होती. या तपासादरम्यान पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली. या तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे, पोलिसांचे एक पथक राजस्थानला पाठवण्यात आले. या पथकाने झुंझुनू येथील एका कारखान्यावर छापा टाकला.