Drowning incidents in Mawal – उन्हाचा तडाखा वाढत असताना पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील नदीपात्रे, विहिरी व पाण्याच्या खाणींवर पोहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, कामगार दिनाच्या सुट्टीत मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने या जलविहाराचा धोका पुन्हा अधोरेखित केला आहे. आनंदासाठी पाण्यात उतरणारे अनेक जण निष्काळजीपणा करत असल्याचे चित्र समोर येत आहे. दहावी-बारावीसह इतर इयत्ताच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना मोकळा वेळ मिळाला आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात घराबाहेर पडून नदीकाठ, विहिरी किंवा खाणींकडे त्यांचा ओढा वाढला आहे. मूळा, पवना आणि इंद्रायणी नदीकाठ, तसेच विविध भागात असलेल्या दगडाच्या खाणी परिसरात पोहण्यासाठी तरुणांची गर्दी दिसत आहे. गटागटाने पोहण्यासाठी जाण्याचा ट्रेंड वाढत आहे. मात्र, मावळ तालुक्यातील जाधववाडी आणि साळुंब्रे येथील दुर्दैवी घटनेने परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले आहे. पाण्याची खोली न ओळखणे, प्रवाहाचा अंदाज न येणे आणि सुरक्षेची साधने नसणे हे मृत्यूचे मुख्य कारण ठरत आहे. अनेकदा पोहता येत नसतानाही तरुण खोल पाण्यात उतरतात. काही जण उंचावरून उड्या मारतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. पवना धरण धोकादायक ठिकाणांकडे वाढता कल शहरातील जलतरण तलावांचे शुल्क परवडत नसल्याने अनेक जण नैसर्गिक पाणवठ्यांकडे वळतात. मात्र, नदीपात्रातील गाळ, विहिरींची अनिश्चित खोली आणि खाणीतील साचलेले पाणी अत्यंत धोकादायक असते. काही ठिकाणी अचानक खोल दरी तयार होते. त्यामुळे पोहणाऱ्यांना अंदाज येत नाही. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणी सावधगिरीचे फलक लावण्यात आले आहेत. तरीही अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. मावळ दुर्घटनेचा धडा घ्या चार तरुणांचा मृत्यू ही केवळ घटना नाही, तर गंभीर इशारा आहे. यापूर्वी देखील पाण्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. क्षणिक आनंदासाठी घेतलेला धोका जीवावर बेतू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. उन्हाळ्यातील जलविहार आनंददायी असला तरी तो सुरक्षित असणे गरजेचे आहे. मावळमधील घटनेने दिलेला धडा लक्षात घेऊन सावधगिरी बाळगल्यासच अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.