Pimpri : प्रवाशांना चिंचवडगाव बस थांब्यावर सोडा

पिंपरी : पुण्याला जाताना प्रवासी घेण्यासाठी पीएमपीएमएलची बस चिंचवडगाव थांब्यावर येते. मात्र पुण्याहून येताना प्रवाशांना चिंचवड पोलीस ठाण्यासमोर सोडतात. याबाबतची बातमी १८ डिसेंबर रोजी दै. प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल पीएमपीएमएलच्या अध्यक्षांनी घेतली. प्रवाशांना चिंचवडगाव बस थांब्यापर्यंत सोडण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
चिंचवड येथील बस स्थानाकाचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे बस स्थानकात जागा अपुरी पडत असल्याने या बस एसकेएफ कंपनी जवळ उभ्या केल्या जात आहे. बसला पुण्याला जायचे असल्यास प्रवाशांना घेण्यासाठी या बस मोरया हॉस्पिटल जवळील शहीद अशोक कामठे थांब्यावर येतात. मात्र पुण्याहून येताना बस प्रवाशांना चिंचवड पोलीस ठाण्यासमोरील थांब्यावर उतरवून एसकेएफ कंपनीकडे जाते.
शहीद अशोक कामठे बस थांब्यावरून बसणारे बहुतांश प्रवासी हे केशवनगर, तानाजीनगर, श्रीधरनगर आदी भागातील असतात. त्यातील बहुतांश प्रवासी हे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व लहान मुले असतात. त्यांना चिंचवड पोलीस ठाण्यासमोरून पायपीट करून यावे लागते. रिक्षाने यायचे झाल्यास ते मनमानी भाडे आकारतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. ज्याप्रमाणे प्रवासी घेण्यासाठी बस शहीद अशोक कामठे बस थांब्यावर आणतात. तसेच प्रवाशांना सोडविण्यासाठी बस शहीद अशोक कामठे थांब्यावर आणावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी पीएमपी प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. तसेच याबाबत दै. प्रभातच्या १८ डिसेंबर रोजीच्या अंकातही वृत्त प्रसिद्ध झाले होते.
या वृत्ताची दखल पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी घेऊन प्रशासनाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच बस मार्ग क्रमांक ३६, ४४, २०४, २७६ व २९८ या मार्गावरील बस चालक व वाहकांना सूचना देऊन प्रवाशांना शहिद अशोक कामठे बस स्थानकावर सोडण्याबाबत सांगण्यात आले आहे. याबाबत काही तक्रार आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पीएमपीएमएलच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रवाशांनी माजी नगरसेवक राजेंद्र गावडे व दै. प्रभातचे याबाबत आभार मानले आहेत.





