कीव्ह – रशियाने काल रात्रभरात युक्रेनवर डझनभर ड्रोनचा मारा केला. युक्रेनने कालपासून एकतर्फीपणे युद्धविरामाची घोषणा केली होती. पण रशियाने हा युद्धविराम धुडकावून लावत ड्रोनचा मारा केल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियन सैन्याने रात्रभरात १०८ ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रे डागली होती. रशियाच्या या हल्ल्यात किमान २२ जण ठार आणि ८० हून अधिक जण जखमी झाले, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा म्हणाले. युक्रेनने स्वतःच घोषित केलेल्या आपल्याच युद्धबंदीचे पालन केले नसल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. युक्रेनने रशियावर डागलेली ५३ ड्रोन रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाडली. मंगळवारी संध्याकाळपासून ते बुधवारी पहाटेदरम्यानच्या कालावधीमध्ये डागण्यात आलेली ही ड्रोन रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमिया द्विपसूमह आणि काळ्या समुद्रावर डागण्यात आली होती, असेही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनने जाहीर केलेल्या युद्धविरामाचे पालन रशियाकडून केले जाणार का नाही, याचा खुलासा रशियाकडून अधिकृतपणे करण्यात आलेला नाही. त्यामुळे या युद्धविरामाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता फारच धूसर असल्याची मानली जाते आहे. दरम्यान दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्याच्या घटनेला ८१ वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी या आठवड्याच्या अखेरीस दोन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. या युद्धविरामाचे रशियाकडून उल्लंघन झाल्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते.