लक्षवेधी: पाकिस्तानचे स्वप्नरंजन..!

आरिफ शेख
पाकिस्तानने मंगळवारी नवा राजकीय नकाशा जारी केला. जम्मू-काश्मीर, लडाख, सियाचीन व गुजरातमधील जुनागढला त्यांनी चक्क पाकिस्तानचा भूभाग जाहीर केले. काश्मीरला विशेषाधिकार देणारे 370 कलम रद्द केल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पाकने ही आगळीक केली. आजवरील वादग्रस्त भूभाग म्हणणाऱ्या पाकने आता तो आपला प्रदेश म्हणत हा “वादग्रस्त’ प्रदेश नसल्याचे एकप्रकारे मान्य केले आहे. इम्रान खान सरकारचे हे स्वप्नरंजन आहे. भारताने याला राजकीय मूर्खपणा म्हणत हास्यास्पद ठरविले आहे.
मूर्खपणा, स्वप्नरंजन, सत्याचा अपलाप, वस्तुस्थितीचा विपर्यास अन् विनाशकाले विपरीत बुद्धी या सर्व वर्णनाचा समुच्चय म्हणजे पाकिस्तान सरकारचा वरील निर्णय. भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने वर्षभर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताविरोधात आकांडतांडव केले.
इस्लामी राष्ट्र सहकार्य परिषदेला (ओआयसी) साकडे घातले. मलेशिया, तुर्कस्तान व कतार वगळता अन्य देशांनी पाकिस्तानला भीक घातली नाही. केवळ तोंडी सहानुभूतीपलीकडे पाकच्या हाती काहीएक लागले नाही. सुरक्षा परिषदेत चीनच्या मदतीने भारताला घेरण्याचा प्रयत्न फसला. वर्षभरात काहीच हाती न लागल्याने देशवासीयांचा दबाव वाढत होता.
अपेक्षाभंगाचे मळभ दूर करण्यासाठी पाकने वरील निर्णय घेतला असावा. नेपाळपासून त्याने नकाशा बदलण्याची प्रेरणा घेतली असावी, चीनचे पाठबळ या मागे आहेच. भारत हा शेजारील देशांच्या भूभागांवर ताबा मिळवतो, हे गृहितक जागतिक व्यासपीठावर अधोरेखित करण्याच्या कटकारस्थानाचा देखील हा भाग असू शकतो.
“कश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे स्वप्न पाहणारी पाकची पिढी आता मावळतीकडे झुकली आहे. काश्मीरचे पाकिस्तानात सामिलीकरण दूरच, उलट तथाकथित “आझाद’ काश्मीर देखील हातचा जातो की काय, ही भीती पाक राज्यकर्त्यांना वर्षभरापासून कायम सतावत असते. नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्न सोडवू शकतात, असे प्रतिपादन निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांनी एकदा केले होते. हा प्रश्न (एकतर्फी) सोडवून मोदींनी ते काही प्रमाणात खरे करून दाखविले.
काश्मीरबाबत पाक राज्यकर्त्यांवर जनतेचा कायम दबाव असतो. आपली हतबलता अन् अगतिकता लपविण्यासाठीच अन् जनतेला खूश करण्यासाठी नकाशा बदलाचा निर्णय त्यांनी घेतला असावा. यास मंत्रिमंडळाची, लष्कराची अन् विरोधीपक्षाची मान्यता मिळवली. पाकच्या आजवरील राज्यकर्त्यांना हे “शहाणपण’ सुचले नव्हते, ते इम्रान खान सरकारने करून दाखविले, असा दावा त्यांचे खुशमस्करे आता करीत आहेत. कालचक्र उलटे फिरवत डोगरा राज्याला 1947 पर्यंत मागे नेल्याचे त्यांना वाटत आहे. इतिहासाला कलाटणी देणारी घटना, “जवॉंमर्द’, ऐतिहासिक पाऊल, काश्मिरीच्या आकांक्षांची पूर्ती आदी स्तुतिसुमने सरकारवर पाक मीडियातून उधळली जात आहेत.
केवळ नकाशा बदलला म्हणजे भू-राजकीय वास्तव बदलेल? आंतरराष्ट्रीय समुदाय हा बदल स्वीकारेल? हा प्रदेश देशाचा भाग बनेल? या निर्णयाने काश्मीरच्या सध्याच्या स्टेटसमध्ये बदल होईल? आदी प्रश्न या निमित्ताने उभे ठाकले आहेत. या सर्वांची उत्तरे अर्थातच नकारात्मक असतील. उलट पाकच्या अंगलट येणारी बाब म्हणजे वरील नकाशा बदलून पाकने संबंधित प्रदेश हा आपला भूभाग असून आता तो “वादग्रस्त’ नसल्याचे एकप्रकारे मान्य केले आहे. म्हणजे जुन्या दाव्यानुसार यूनोमध्ये त्याला कितपत दाद मागता येईल, याबाबत संभ्रम आहे.
भारताने आमच्या भूभागावर “बेकायदेशीर’ कब्जा केल्याचा आरोप स्वतः पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकताच केला. पाकची भविष्यात भारताविरोधात ही नवी रणनीती असावी. वरील नकाशा इम्रान खान यांनी दस्तूरखुद्द माध्यमांसमोर मांडला. सुरक्षा समितीच्या ठरावाचे पालुपद त्यांनी लावून धरले. लष्करी नव्हे तर राजकीय सोल्युशन आम्हाला हवंय, यूनोने 73 वर्षांपूर्वी केलेला वायदा कधी पूर्ण करणार? आम्ही त्याचे स्मरण करून देत आहोत, असे इम्रान खान म्हणाले. शेजारी बसलेले परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी या नकाशाला काश्मिरी नेतृत्वाने देखील मान्यता दिली असल्याचे हास्यास्पद विधान केले.
काश्मिरी फुटीरतावाद्यांना या प्रदेशाचे स्वतंत्र राष्ट्र हवे होते. त्यांना पाकमधील सामिलीकरण नको होते, याचे भान कुरेशी यांना राहिले नसावे. कालपर्यंत आम्ही बंद दरवाजात जे दावे करीत होतो, ते आता उजळ माथ्याने अमलात आणल्याची दर्पोक्ती कुरेशी यांनी केली.
आपण जारी केलेला नकाशा म्हणजे आता काश्मीरच्या “स्वातंत्र्याचा सूर्योदय’ असल्याच्या थाटात इम्रान खान प्रेसला ब्रिफिंग करीत होते. 9 वर्षांचा असताना मी क्रिकेटर होण्याचे स्वप्न बाळगले, ते खरे झाले. जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूची महत्त्वाकांक्षा सत्यात उतरली. विश्वकप जिंकण्याचे उद्दिष्ट साध्य केले. राजकीय पक्षाची स्थापना अन् देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे अशक्यप्राय आवाहन पेलले, असे संदर्भ देत आता काश्मिरी स्वातंत्र्याचे स्वप्न वास्तवात आणू, असे त्यांनी देशवासीयांना सांगितले.
पाकच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भूभाग कायम राखता आला तरी खूप काही मिळविल्यासारखे असेल, असा त्यांना घरचा आहेर मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. हे सर्व करताना त्यांनी गुजरातच्या जुनागढला देखील पाकिस्तानी नकाशात समाविष्ट करून स्वतःचे हसे करून घेतले. जुनागढचे नवाब सर मोहम्मद महाबत खान यांना त्यांचे दिवाण शहनवाज भुट्टो (माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचे पिताश्री) यांनी भरीस घालून जुनागढचे पाकमध्ये सामिलीकरण करण्यास उद्युक्त केले.
80 टक्के जनता हिंदू अन् पाकशी भौगोलिक सलगी नसताना नवाबांच्या वरील निर्णयाने जनतेत भयकंप पसरला होता. सरदार पटेल, लॉर्ड माऊंट बॅटन व जिना यांनी यावर बराच खल केला. सार्वमताच्या आधारे याचा फैसला करण्याचा निर्णय झाला. सार्वमत अर्थातच भारताच्या बाजूने होते. बोटावर मोजण्याइतके नवाबी घराण्यातील मते पाकच्या बाजूने गेली. त्या आधारे जुनागढ भारतात राहिला. जिना यांना हाच कित्ता काश्मीरमध्ये गिरवायचा होता, मात्र महाराजा हरिसिंग यांनी प्रारंभी भारत-पाक पासून समान अंतर ठेवत आपले स्वतंत्र अस्तित्व राखले.
पुढे पाक टोळीवाल्यानी हल्ले करून डोगरा संस्थान जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराजांनी कश्मीरचे भारतात सामिलीकरण केले व भारतीय सैन्याने टोळीवाल्यांना मागे रेटले. टोळीवाल्यांच्या कब्जातील आझाद काश्मीर व भारतीय काश्मीर अशी या राज्याची विभागणी झाली. जुनागढप्रमाणेच काश्मीरचा निर्णय घडवून आणणे जिनांना जमले नाही. धूर्त जिनांचा हा कावा भारतामुळे व पुढे जिनांच्या आजारपणामुळे फोल ठरला.
इम्रान खान सरकार आता आपल्या पूर्वसुरींचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलल्याप्रमाणे बोलत होते. इम्रान खान यांचा मोदींना बाउन्सर असे मथळे पाक माध्यमात झळकले. इम्रान यांच्या राजकीय बाउन्सरला प्रेक्षकांत भिरकावण्याइतके सक्षम नेतृत्व भारताकडे आहे. याची कबुली खुद्द पाकमधील वास्तवाचे भान असणारे मोजके नेते देत असतात. हेही नसे थोडके.
नेपाळसारख्या चिमुकल्या देशाने भारताशी सीमावाद झाल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया व बदललेला नकाशा यातून कदाचित पाक राज्यकर्त्यांनी प्रेरणा घेतली असावी. नेपाळने दुरुस्त केलेला नकाशा थेट यूनोकडे दिला, पाकने अजून तसे केलेले नाही. अन् असे करणे आंतरराष्ट्रीय कायद्याने आत्मघात ठरेल. हा प्रदेश वादग्रस्त नसल्याचे मान्य केल्यासारखे ते होईल.
आंतरराष्ट्रीय पातळीवर यातून फार काही पाकच्या हाती लागणार नाही. आंतरराष्ट्रीय सीमा, ताबारेषा, प्रत्यक्ष ताबारेषा अन् “वादग्रस्त प्रदेश’ आदींची आता सरमिसळ या नकाशामुळे झाली आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, जुनागढ आदींवर भारताचा बेकायदा कब्जा असल्याचा अपप्रचार पाक भविष्यात करू शकतो. पाकच्या जनतेला मूर्खांच्या नंदनवनातील सैर घडविण्यापेक्षा याला अधिक महत्त्व नाही.





