Delhi Capitals : दिल्लीचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पूर्ण – पंत

नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याचे माझे स्वप्न होते, ते आता पूर्ण झाले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी संघाचे नेतृत्व माझ्याकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त समजताच खूप आनंद झाला, आता यंदाच्या स्पर्धेत संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करीन, अशा शब्दांत ऋषभ पंत याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो खेळणार नसल्याचे समोर आल्यावर दिल्लीच्या कर्णधारपदी यष्टिरक्षक फलंदाज पंत याची नियुक्ती करण्यात आली. त्यावर बोलताना पंतने दिल्ली संघाचे मालक तसेच मेन्टॉर यांना धन्यवाद दिले आहे. एक ना एक दिवस दिल्ली संघाचे नेतृत्व करण्याचे माझे स्वप्न होते. यंदाच्या स्पर्धेत ते स्वप्न सत्यात उतरत आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, असेही पंत म्हणाला.
मी दिल्लीकर आहे. याच शहरात लहानाचा मोठा झालो. क्रिकेटचे धडेही इथेच गिरवले. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतर्फेच माझ्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात झाली. गेल्या वर्षी आमची कामगिरी चांगली झाली. मात्र, विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता यंदा हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व खेळाडूंकडून सरस कामगिरी करून घेत नेतृत्व यशस्वी करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही पंतने सांगितले.
पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत 68 सामने खेळले असून, त्यात 2 हजार 79 धावा केल्या आहेत. त्यात 183 चौकार व 103 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 1 शतकी खेळी तसेच 12 अर्धशतकांची नोंद आहे.





