शीना बोरा हत्याकांडाला नाट्यमय कलाटणी? इंद्राणी मुखर्जीचा सीबीआयला पत्र लिहीत ‘खळबळजनक’ दावा

मुंबई – गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हत्येत आरोपी असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला पाठवलेल्या पत्रात केला आहे.
कारागृहात नुकतीच आपली एका महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचे आपल्याला सांगितले आहे, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. देशपातळीवर वाचल्या जाणाऱ्या एका प्रख्यात साप्ताहीकाने याबाबतची बातमी दिली आहे. त्यानुसार सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी सध्या तुरूंगात आहे. गेल्याच महिन्यात मुंबई हायकोर्टाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता. इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याला पोलिसांनी अटक केल्यानंतर शीना बोरा हत्याकांड उघडकीस आले होते.
चौकशीदरम्यान त्याने आपण अजून एका प्रकरणात सहभागी असल्याचे सांगत तो माफीचा साक्षीदार झाला. इंद्राणी मुखर्जीनेच शीना बोराची हत्या केल्याचा कबुलीजबाब त्याने दिला होता. पुढील तपासात शीना इंद्राणीची मुलगी होती आणि मुंबईत घर मिळवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती, अशी माहिती पुढे आली होती.
मुंबई पोलीस आणि सीबीआयच्या माहितीनुसार, गुवाहाटीत राहणाऱ्या शीनाने मुंबईत इंद्राणीची भेट घेतली. इंद्राणीने यावेळी पती पीटर मखर्जीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर ती अचानक गायब झाली होती. शीना बोरा गायब झाल्यानंतर पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण राहुलला शीना पुढील आयुष्यासाठी विदेशात निघून गेली असल्याचे सांगण्यात आले.
इंद्राणीने शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. पीटर आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला आहे.




