प्रभात वृत्तसेवा मंचर – मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाला आमच्या भागात शेळ्या-मेंढ्या चारायच्या नाहीत, तलावाकडे बकऱ्या घेऊन यायच्या नाही,तलावाचे पाणी पाजायचे नाही,असे म्हणत मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात शुक्रवार दि.१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बायडाबाई लहानू कोळपे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी बायडाबाई लहानू कोळपे व त्यांचे कुटुंबीय हे मेंढपाळ असून ते सध्या मांदळवाडी (ता.आंबेगाव) येथे वास्तव्यास आहेत. गुरुवार, दि.१८ रोजी दुपारी सव्वा वाजेच्या दरम्यान कोळपे कुटुंबीय मांदळवाडी ते पिंपळवाडी जाणाऱ्या रोडवर शेळ्या-मेंढ्या घेऊन जात असताना त्या ठिकाणी पोपट चंदर आदक, संस्कार पोपट आदक, सुनीता पोपट आदक, चंदर नारायण आदक व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा.मांदळेवाडी) यांनी अडवून अजिबात तलावामध्ये बकऱ्यांना पाणी पाजायचे नाही, तुमच्या बकऱ्या रस्त्याच्या खाली उतरावयाच्या नाही, असे म्हणत पोपट आदक याने कुऱ्हाडीने फिर्यादी बायडाबाई कोळपे यांचे पती लहानू कोळपे यांना कपाळावर कुऱ्हाड मारून जखमी केले. तसेच इतरांनी दगड फेकून मारत, शिवीगाळ,दमदाटी केली. सुनिता पोपट आदक हिने फिर्यादी महिला व तिची मुलगी गऊबाई शिंदे हिला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या सर्वांनी पुन्हा या ठिकाणी बकरी घेऊन यायचे नाही. आले तर तुम्हाला जीवे मारून टाकू. अशी धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी पारगाव पोलीस पुढील तपास करत आहे.