कार्यक्रम, नाटक, मैफिली बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर पिंपरी – करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने कलाकार हतबल झाले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, मैफिली बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दूरचित्रवाहिनीवरील मालिका सुरू झाल्या असल्या तरीही अद्याप नाट्यगृह व चित्रपटगृह सुरू न झाल्याने नाट्यकलावंत आणि चित्रपट कलावंतांसमोर अडचणींचा डोंगर कायम आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. लॉकडाऊन होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही चित्रपटगृह आणि नाट्यगृहांचे लॉक उघडलेले नाही. सरकारकडूनही त्याबाबत ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. दूरचित्रवाहिनीवरील मालिकांचे चित्रीकरण आणि नवीन भाग प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे. नाट्यगृह बंद असल्याने नाटकांचे प्रयोग मात्र बंद आहेत. त्याशिवाय, नाट्यगृहांमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी महोत्सव, ऑर्केस्ट्रा आदींना खोडा बसला आहे. चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपट निर्मितीला देखील खंड पडला आहे. करोनाच्या महामारीमुळे लोककलावंतांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वाघ्या-मुरळी कलावंत, तमाशा कलावंत, आर्केस्ट्रा कलावंत यांच्यासमोर त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनचा लोककलावंतांबरोबरच मोठ्या कलावंतांना फटका बसला आहे. त्यांच्या देश-विदेशातील मैफिली, कार्यक्रम बंद पडले आहेत. केंद्र व राज्य सरकारने कलाकारांच्या या परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा कलाकार व्यक्त करीत आहेत. कलाकारांसमोर निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मध्यंतरी पुण्यात देखील कलाकारांनी आंदोलन केले होते. त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद असल्याने नाटक, चित्रपट निर्मितीचे काम थंडावले आहे. राज्य सरकारने नियमावली निश्चित करून सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृह आणि चित्रपटगृह 1 ऑक्टोंबरपासून किंवा दसऱ्यापासून सुरू करावे. नाट्यगृह आणि चित्रपटगृहात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात यावे. – डॉ. संजीवकुमार पाटील, नाट्य अभिनेते. करोना संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत कलाकारांशी चर्चा केली. सध्या कलाकारांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली असल्याचे समोर आले. लोककलावंतांच्या तर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या कलाकारांचे देश-विदेशातील कार्यक्रम, मैफिली रद्द झाल्या आहेत. सरकारने तातडीने कलाकारांच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी करून त्यांना दरमहा किमान आणि कमाल निधी घोषित करावा. – संतोष घंटे, प्रसिद्ध संवादिनी वादक