ड्रेनेज साफसफाई ठेकेदाराकडेच

“फ’, “ह’ क्षेत्रीय हद्दीतील काम ः वार्षिक सव्वा दोन कोटींचा खर्च 

पिंपरी  – महापालिकेच्या “फ’ आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जलनि:सारण नलिकांची साफसफाई आणि ड्रेनेज चोकअपचे काम ठेकेदारी पद्धतीने केले जात असून पुढील वर्षभरासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका 2 कोटी 18 लाख रूपये मोजणार आहे.
“फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कामासाठी सूरज कॉन्ट्रॅक्‍टर या ठेकेदार संस्थेची सन 2015 मध्ये पाच वर्षासाठी नियुक्ती केली आहे. सुरूवातीस त्यांना दोन वर्षे कालावधीसाठी काम देण्यात आले. त्यानंतर कामाची प्रगती विचारात घेऊन पुढील प्रत्येक वर्षासाठी स्थायी समितीच्या मान्यतेने मुदतवाढ देण्याचे अटी-शर्तीनुसार ठरले होते. या निविदेस स्थायी समितीने 21 फ्रेब्रुवारी 2015 रोजी मंजुरी दिली आहे.

स्थायीच्या ठरावानुसार, कामाची निविदा रक्कम 1 कोटी 5 लाख रूपयांसाठी 4.84 टक्के कमी या दराने म्हणजेच 1 कोटी 29 हजार रूपये दराने काम करून घेण्यास तसेच सुरूवातीस एक वर्षे कालावधीसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे. पुढील प्रत्येक वर्षासाठी मान्यता देण्याकरिता पुन्हा स्थायी समितीची मंजुरी घेऊनच कामाचा परत करारनामा करून नंतरच वाढीव मुदत देण्यात यावी, असे अटी-शर्तीत नमूद केले आहे. त्यानुसार या कामासाठी पाचव्या वर्षाकरिताही स्थायी समितीने नुकतीच मुदतवाढ दिली आहे. ठेकेदाराला पाचव्या वर्षाकरिता एक वर्षे कालावधीसाठी चतुर्थ वर्षापेक्षा 10 टक्के जास्त दरवाढीसह 1 कोटी 19 लाख रूपयांमध्ये काम करून घेण्यात येणार आहे.

“ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कामासाठी मनीष असोसिएटस्‌ यांना 30 मे 2018 रोजी मंजुरी मिळाली आहे. एक वर्षे कालावधीसाठी 98 लाख 97 हजार रूपये या दराने त्यांना हे काम देण्यात आले आहे. त्यांच्या पहिल्या वर्षाची मुदत पूर्ण होत असल्याने पुढील एक वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी 98 लाख 97 हजार रूपये खर्च होणार आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी या कामास 35 लाख रूपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी किरकोळ देखभाल दुरूस्ती या लेखाशिर्षातील कामामधून 80 लाख रूपये या कामासाठी वळविण्यात येणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×