Dr. Vinay Kore: कर्नाटक व तेलंगणा राज्यांच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लिंगायत समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून राज्यातील इतर जिल्ह्यांतही समाज मोठ्या संख्येने पसरलेला आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत लिंगायत समाजातील अनेक प्रतिनिधी विजयी झाले आहेत. राज्यभरात सुमारे दीड कोटी समाजबांधव असल्याचा अंदाज असून, सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ‘हिंदू लिंगायत’ अशी स्वतंत्र नोंद व्हावी यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी केले. वीरशैव लिंगायत संघाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. त्र्यंबक दापकेकर होते. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, भोकरचे नगराध्यक्ष भगवान दंडवे, सूर्यकांत विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. विनय कोरे यांनी लिंगायत समाजाने एकजुटीने काम करण्याची गरज व्यक्त केली. आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटींमुळे समाजाला अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. या अटी शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असून येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात संजय कोडगे यांनी पक्षभेद विसरून समाजहितासाठी काम करण्याची गरज अधोरेखित केली. लिंगायत समाजासाठीच्या आर्थिक विकास महामंडळाला पुरेशी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावीत व प्रत्येक जिल्ह्यात अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी मांडली. अनेक गावांमध्ये लिंगायत समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतर त्यांनी मंगळवेढा परिसराचा दौरा करून समाजाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. नवी मुंबई येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पिंपरी-चिंचवडमध्येही जागा शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातही वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यसभेत महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने ‘संसदरत्न’सारखा पुरस्कार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ती अपुरी असून ती किमान एक हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोलापूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अध्यासन केंद्राच्या धर्तीवर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातही पुढील एका महिन्यात असेच अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही डॉ. अजित गोपछडे यांनी केली.