पुणे : कर्नाटकच्या कलबुर्गी येथील रहिवासी असलेले अर्थतज्ज्ञ डाॅ. श्रीप्रकाश प्रकाशचंद्र कोठारी, मॅसॅच्युसेट्स यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेच्या ट्रेझरी विभागात आर्थिक धोरणाचे सहाय्यक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोठारी यांना लिहिलेल्या पत्रात, व्हाईट हाऊसच्या ट्रेझरी डिपार्टमेंटचे संपर्क अधिकारी जिलियन लेन वायंट यांनी म्हटले आहे की, ही नियुक्ती अमेरिकन सिनेटच्या संमतीने आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने केली जात आहे. दैनिक प्रभातचे संस्थापक पत्रमहर्षी वा. रा. कोठारी यांचे नातू असलेले डाॅ. श्रीप्रकाश कोठारी यांच्या या नियुक्तीने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. डाॅ. कोठारी यांनी अहमदाबादच्या बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॉजी अँड सायन्सेसमधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केले. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे अकाऊंट आणि फायनान्स या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. येथेच त्यांनी उप-अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. डाॅ. श्रीप्रकाश कोठारी यांनी आयोवा विद्यापीठातून पीएचडी केली आहे. डाॅ. श्रीप्रकाश कोठारी हे २०१५ ते २०१९ पर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे संचालक म्हणून काम केले होते. केंद्र सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आणि २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. २०१९ ते २०२१ पर्यंत त्यांनी अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनमध्ये आर्थिक आणि जोखीम विभागात मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.फायनान्शिल रिपोर्टींग, व्हॅल्युएशन, असेट अलोकेशन, इंटरनॅशनल अकौंटींग प्रॅक्टिसेस, इन्व्हेस्टमेंट, पर्मफाॅर्मन्स अँड डेरिव्हेटीव्हज आदी विषयांवर त्यांचा अभ्यास आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे ते माजी विद्यार्थी आहेत.