Pune : सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचवा

पुणे : शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत वेळेत पोहोचवा, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनमाणसांत लोकप्रिय आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व शासकीय कार्यालयांच्या समन्वयाने आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, उपशहर प्रमुख संजय डोंगरे, संजय तुरेकर, अक्षदा धुमाळ, शहर समन्वयक संजय जाधव शिवसैनिक उपस्थित होते.
याशिवाय तहसीलदार सूर्यकांत येवले, शहर उपायुक्त अविनाश सपकाळ, निवडणूक नायब तहसीलदार सायली धस, आरोग्य विभाग पर्यवेक्षक प्रशांत कुलकर्णी, समाजकल्याण अधिकारी रामदास चव्हाण, परिमंडळ अधिकारी ओव्हाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी लाभार्थ्यांना लाभाचे आदेश वाटप, विविध दाखले वाटप, क्षयरोग पीडितांना कीट वाटप, पिंक रिक्षा लाभार्थ्यांना रिक्षा वाटप करण्यात आले. शिबिराचा १५० पेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला. शेकडो नागरिकांनी विविध योजनांची माहिती घेत अर्ज दाखल केले. धनंजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.




