पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे आता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर हे उद्या (दि.17) सूत्रे स्वीकारणार आहेत.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने हे पद रिक्त झाले होते. नवे कुलगुरू नियुक्त करण्यासाठी शासनाला नियुक्तीप्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. तोपर्यंत डॉ. नितीन करमळकर यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
याबाबत कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, “शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. बुधवारी सकाळी या पदाचा कार्यभार स्विकारणार आहे.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी डॉ. करमळकर यांनी पाच वर्षापूर्वी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी कुलगुरू म्हणून डॉ. देवानंद शिंदे यांची निवड झाली होती. त्यानंतर या निमित्ताने आता डॉ. करमळकर यांचेही शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू होण्याचे स्वप्न साकार झाले आहे.