पुणे – रविवार दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी आदरणीय डॉ. कांतीलाल हस्तीमल संचेती यांना ‘द नोबल फांउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने ‘नोबल पुरस्कार’ देउन सन्मानित करण्यात आले. संचेती हॉस्पिटल साठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
जयपूर स्थित द नोबल फाउंडेशन ऑफ इंडिया ही संस्था संपूर्ण जगभरात जागतिक शांतता, जागतिक बंधुता आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कटिबध्द आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रसिध्द कायदेतज्ञ डॉ. एच.सी. गनेशिया स्वत: हा पुरस्कार देण्यासाठी पुण्यात आले होते. भारताच्या माजी राष्ट्रपती मा. श्री. प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी डॉ. के.एच. संचेती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोविड – 19 मधील बंधनांचे पालन करून हा सोहळा या वर्षी साधारण स्वरूपात पार पडला.
डॉ. संचेती यांना यापूर्वी यू.एन.ओ. मध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. तसेच भारताचे सर्वोच्च पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व बी.सी. रॉय पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आहे. देशात क्वचितच अशी माणसे असतील ज्यांना असा सन्मान प्राप्त झाला आहे. हा एक सुंदर योगायोग आहे की देशात आणि परदेशात सुध्दा स्वत:ची वेगळी ओळख असलेले सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. के.एच संचेती यांचा ‘द नोबल फाउंडेशन ऑफ इंडिया’ च्या वतीने गौरव होणे. डॉ. संचेती यांना हा पुरस्कार राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय कार्य, आरोग्य क्षेत्रातील कार्य तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गनेशिया यांनी डॉ. संचेती हे या तिन्ही क्षेत्रात काम करणारे एक महान व्यक्ती आहेत, असे संबोधिले. तसेच अशा ज्येष्ठ व्यक्ती युगांनंतर जन्माला येतात असेही म्हणाले. हा पुरस्कार म्हणजे जगातील महान व्यक्तींनी विविध क्षेत्रात केलेल्या अद्वितीय मानव कल्याण कार्याचा आणि दुर्मिळ व्यक्तींचा गौरव ओ. डॉ. गनेशिया पुढे म्हणाले की, डॉ. संचेती यांना हा पुरस्कार प्रदान करताना संस्थेला अतिशय अभिमान वाटत आहे.
‘द नोबल फाउंडेशन ऑफ इंडिया’ ही संस्था दीर्घकाळापासून गोरगरीब, दरिद्री आणि लाचार, गरजू मानवजाती साठी समर्पित आहे. जिथे जात, धर्म, लिगंभेद, उच्चनीच अशा कुठल्याच भेदभावाला जागा नाही. ही संस्था जगभरातील मानवजाती, प्राणी आणि निसर्ग यांच्या कल्याणार्थ सतत सेवामग्न आहे. मानवजातीची सेवा आणि कल्याण हीच संस्थेची श्रध्दा आणि धर्म आहे. जागतिक पातळीवर ज्यांनी अद्वितीय अनुकरणीय मानवतावादी कार्याचे विक्रम केले आहेत, अशा महान व्यक्तीमत्वांचा ही संस्था दर वर्षी सन्मान करते. फाउंडेशनने 2018 साली परमपूज्य दादी जानकी (ब्रम्हकुमारी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय प्रमुख / अध्यक्षा) यांना त्यांच्या 103 व्या जन्मदिवशी प्रथम पुरस्कार देउन सन्मानित केले होते. माउंट अबू येथील ब्रम्हकुमारींच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयात 20,000 ब्रम्हचारी या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.
आमचे लाडके संस्थापक आ. डॉ. के.एच. संचेती यांनी सहा दशकाहून अधिक काळ जी रूग्ण सेवा केली, भारतातील पहिल्या नी इम्प्लांटची निर्मिती केली, पोलिओ निर्मूलनात मोठा हातभार लावला, विविध शिबिरांमधून लाखो रूग्णांना वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न केला, या सर्व कार्यासाठी पुन्हा एकदा त्यांचा अशा संस्थेकडून सन्मान होणे ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. डॉ. संचेती यांना शतश: नमन !
-डॉ. पराग संचेती