कराड – कराड परिसर हा भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांच्यामुळेच सील झाला, अशा प्रकारचा बदनामीकारक मेसेज व्हॉटस्ऍप ग्रुपवर व्हायरल करून डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांची बदनामी करणाऱ्या बलराज पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी कृष्णा हॉस्पिटलचे सुरक्षा अधिकारी विलास चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले व डॉ. सुरेश भोसले यांची बदनामी करणारा आणि त्यांच्यामुळे कराड परिसर सील झाल्याचा मेसेज बलराज पाटील यांनी काल (दि. 23) दुपारी पावणेतीनच्या सुमारास “2024 ला येणारे वादळ’ या व्हॉटस्ऍप ग्रुपवर पाठवला. वास्तविक करोनाविरोधातील लढ्यात कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व कर्मचारी जीवाचे रान करून काम करत आहेत. अशा स्थितीत हॉस्पिटलचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे तपास करत आहेत.