डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान ‘युवकांचे प्रेरणास्थान’ ! सात वर्ष होते तळेगाव दाभाडेमध्ये वास्तव्य

तळेगाव दाभाडे – शहरातील तळेगाव चाकण महामार्गाजवळ हरणेश्वर टेकडीच्या बाजुला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. सन 1949 ते 1956 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे येथे वास्तव्य होते. डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असणाऱ्या या निवासस्थानात अनुयायांना मोठी प्रेरणा मिळत असते. या ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने या निवासस्थानाची देखभाल केली जाते.
या निवासस्थानाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचे पुतळे आहेत. निवासस्थानाच्या आत जाताच डॉ. बाबासाहेबांच्या ओजस्वी विचारांचे अस्तित्व आजही या ठिकाणी जाणवते. निवासस्थानात गौतमबुद्धांची सुंदर शांत व मनमोहक अशी मूर्ती आहे.
सुशोभीकरण आणि देखभाल
निवासस्थानाचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डिसेंबर 2020 साली एक कोटी 11 लाख 76 हजार 546 रुपये मिळाले. या निधीतून निवासस्थानाचे सुशोभीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे निवासस्थान तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान समिती देखभाल करीत आहे, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा ऍड. रंजना भोसले आणि सचिव किसन थूल यांनी दिली.
विविध उपक्रम
येथे डॉ. आंबेडकर जयंती, संविधान दिन, धम्मचक्र प्रवर्तनदिन, तसेच कॅन्डल मार्च आदी उपक्रम होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने येथील निवासस्थानामध्ये आंबेडकर करत असणाऱ्या अभ्यासक्रम पद्धतीनुसार सलग 18 तास अभ्यासक्रम हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी देशभरातून नागरिक निवासस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या दोन्ही प्लॅटफॉर्म आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी येथे उतरावे या बोर्डांचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली असून आंबेडकरांवर रचलेल्या गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान प्रेरणादायी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे 35 विद्यार्थी अभ्यास करत आहेत. ही जागा त्यांना दिशादर्शक आणि प्रेरणादायी असल्याचे विद्यार्थी सांगतात.
बाबासाहेबांचा स्पर्श लाभलेल्या वस्तू
या निवासस्थानात डॉ. बाबासाहेब लेखनासाठी वापरत असलेला एक लाकडी टेबल आणि लाकडी कपाट आजही जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे. त्यांनी हा बंगला 26 नोव्हेंबर 1948 मध्ये खरेदी केल्याचे सांगितले जाते. सन 1951 मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची बैठक डॉ. बाबासाहेब आणि माईसाहेबांनी याच बंगल्यात घेतली. डॉ. बाबासाहेबा यांच्यासोबत आचार्य अत्रे येथे आले होते. संत गाडगेबाबाही येऊन गेल्याचे सांगितले जाते. 12 मे 1957 साली बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांनी येथे अनुयायांना दीक्षा दिली.





