नेवासा – येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने अँड. संजय सुखदान यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “जय भीम, जय जय भीम”च्या जयघोषाने वातावरण दणाणले. संतोष खाडे यांनी बाबासाहेबांच्या संघर्षाचे महत्त्व विशद केले. “त्यांच्या १४ व्या कलमामुळे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मार्ग खुला झाला. गोरगरिबांची मुले आज उच्च पदांवर आहेत, ही बाबासाहेबांचीच किमया आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी तरुणांना शिक्षण पूर्ण करून, गुन्हेगारीपासून दूर राहून कायद्याच्या चौकटीत प्रगती साधण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिल्याचे सांगत, त्यांच्या कायद्यांचे पालन करण्याचा संदेश त्यांनी दिला. अँड. संजय सुखदान यांनी प्रास्ताविकात नेवास्यातील अतिक्रमण कारवाईमुळे व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वर्गणीशिवाय अभिवादनाचा साधा कार्यक्रम ठेवल्याचे सांगितले. “बाबासाहेबांच्या शिकवणी अंगीकारून समाजकार्य करत राहू,” असे त्यांनी ठासून सांगितले. कार्यक्रमात नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, प्रदीप पाठक, बन्सीभाऊ सातपूते, सतीश पिंपळे, मोहन गायकवाड, वंसाबाई सुखदान यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. नेवासा शहरातील सर्वधर्मीय नागरिक, घटनापती प्रतिष्ठानचे सदस्य, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र मापारी, संदीप बेहळे, विकास चव्हाण, अरुण जाधव यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर अँड. संजय सुखदान यांनी सर्वांचे आभार मानले. बाबासाहेबांचा समतेचा विचार जागवणारा हा कार्यक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.