वाघापूर, – पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणार्या गावातील अनेक भागात रस्त्याच्या, शेतीच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मर (रोहित्र)च्या डीपी उघड्या आहेत. या उघड्या डीपी अधिक धोकादायक बनत आहेत. डीपी बॉक्सची अक्षरशः दुरवस्था झाली असून या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायकरित्या सताड उघड्या पडलेल्या डीपींमुळे नागरिकांची सुरक्षा वार्यावर पडली आहे. महावितरणच्या मुख्य केंद्रातून येणारा विद्युत प्रवाह अतिउच्च दाबाच्या स्वरूपात असतो. तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात नाही. ग्राहक आणि उच्च दाब यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे जागोजागी दिसणारे रोहित्र आहेत. या रोहित्राची योग्य देखरेख आणि देखभाल करण्याचे काम महावितरणकडे असते. मात्र वर्षानुवर्षे याची देखभाल केली जात नाही. यामुळे वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडतात. पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणार्या अनेक भागातील रोहित्रांना संरक्षक जाळी अथवा गेट नाही. अनेक ठिकाणी उघड्या डीपी लहान मुलांचा हात पोहोचेल एवढ्या उंचीवर आहेत. विविध भागांत वेगवेगळ्या क्षमतेचे एकाहून अधिक रोहित्र आहेत. काही ट्रान्सफॉर्मर वगळता अनेक ट्रान्सफॉर्मरमध्ये वारंवार बिघाड होण्यासोबतच ते धोकादायक बनले आहेत. ट्रान्सफॉर्ममधून अनेक ठिकाणी ऑईल गळती होते, फ्यूज वायर, डीपी बॉक्सही उघडे आहेत. बहुतांश डीपी बॉक्स चालू अवस्थेत असल्याने वीजप्रवाह चालू असताना दुर्घटना होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बॉक्सची अक्षरश दुरवस्था झाली असून तारा गुंडाळून लावलेले कुलूप, गंज, निखळून पडलेला पत्रा आणि चढलेल्या झाडे वेली अशी अवस्था आहे. याकडे महावितरणकडून दुर्लक्ष झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला. यासंदर्भात राजेवाडीचे शाखा अभियंता जिवन ठोंबरे यांना दोन वेळा फोन केला असता त्यांनी उत्तर नाही दिले. शेतकरी मेटाकुटीला एक तर दिवस पाळीला वीज नाही. त्यात डीपीची अशी दयनीय अवस्था यामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या डीपीची दयनीय अवस्था गेल्या काही वर्षांपासून असून या डीपीकडे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी फ्युज तर नाहीतच ज्या ठिकाणी वीज पुरवठा होते त्या ठिकाणी चक्क तारा लावल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. जर एखाद्या वेळी फ्युज गेला. तर तो कुणी टाकायचा हाही मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे. अचानकपणे जर एखादा शेतकरी त्यठिकाणी फ्युज टाकण्यासाठी गेला व त्याच्या जिवीतास काही इजा झाली तर ते कुटुंब वार्यावर येणार अशीच सध्या परिस्थीती आहे. जीवित हानी झाल्यावरच जाग येणार का? पुरंदरच्या पूर्व भागातील वाघापूर, आंंबळेे, राजेेेवाडी, सिंगापूर, गुरोळी, टेकवडी, माळशिरस, पोंढे या गावांतील 30 ते 40 डीपीची हीच अवस्था आहे. अशा डीपीच नेमके करायचे काय? एखाद्याची जीवित हानी झाल्यावरच महावितरणला जाग येणार काय? असाच प्रश्न या ठिकाणी सध्या शेतकर्यांना पडलेला दिसत आहे.