सनी साळवे हत्या प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेप ! तीन जणांची निर्दोष मुक्तता

धुळे – दलित हत्याकांड सनी साळवे खून प्रकरणी धुळे न्यायालयाने चार आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेतील आठ आरोपींपैकी चार जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून उर्वरित तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दीपक फुलपगारे, गुड्या उर्फ मयूर फुलपगारे आणि वैभव गवळे अशी दुहेरी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, प्रशांत उर्फ भैया बाविस्कर, दिपक उर्फ सनी सानप आणि गोपाल चौधरी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सनी साळवे याच्या हत्येप्रकरणी धुळे सत्र न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्याचा आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. न्यायाधीश डी.एम. अहिरे यांनी या हत्येप्रकरणी दिलेल्या निकालात यातील चार आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेतील आठ आरोपींपैकी तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान, धुळे शहरात 18 एप्रिल 2018 रोजी देवपूरात असलेल्या नरसिंह बियर बार जवळ गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. सनी साळवे, सुमेध सुर्यवंशी आणि सागर साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातही आरोपी पोहोचले आणि त्यांनी जखमींना धमकावण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी केलेल्या मारहाणीत सनी साळवे या 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना
विशेष म्हणजे या प्रकरणात जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा पद्धतीने शिक्षा सुनावण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या निकालानंतर सनी साळवे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. सनीच्या कुटुंबीयांनी कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त केले आहे.





