खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे

उद्धव ठाकरे : खटाव तालुक्‍यातील नुकसानीचा घेतला आढावा

बुध – परतीच्या पावसाने खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे चेहऱ्यावरील दुःख पहावत नाहीत. मी तुम्हाला दिलासा देण्यासाठी आलो आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले संसार उघड्यावर पाडू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्‍वास देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे आत्मबळ वाढविले. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माण-खटाव तालुका दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी काटेवाडी, ता. खटाव येथील श्रीकांत दादासाहेब कोरडे यांच्या आले पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती नीलम गोऱ्हे, खा. विनायक राऊत, माजी पालकमंत्री विजय शिवतारे, आ. महेश शिंदे, मिलिद नार्वेकर, प्रा. नितीन बानगुडे पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे, सरपंच बाळासाहेब जगदाळे, प्रांताधिकारी जिरंगे, तहसिलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे सरकार स्थापन होणारच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. शासनाने मागेल त्याला शेततळी दिली असून पाऊस इतका पडला आहे की पाणी झिरपलेच नाही. त्यामुळे शेताचे तळे बनले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या शेतात कुजलेले पीक बाहेर काढून शेत साफ करण्यासाठी मनरेगामधून प्रयत्न केले पाहिजेत. झालेल्या नुकसानापोटी तातडीने हेक्‍टरी पंचवीस हजार रुपये द्यावेत, नाहीतर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे.

शासनाने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचे विधानसभेच्या अगोदर ठरले होते. पण अजुनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. विमा कंपन्या दलाल झाल्या आहेत. शासकीय मदत मिळताना कोणीही राजकारण आणू नये. पंचनामे झाले आहेत. त्यामुळे तातडीने पंचवीस हजार दिले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांसाठी शिवसेनेकडून मदत केंद्र उभी करावीत.

शिवसेनेने दिलेले शब्द लवकर आम्ही पूर्ण करू, चारा छावण्याचे पैसे देण्यासाठी प्रयत्त केले जातील. तसेच वचननाम्याप्रमाणे कर्जमाफीसुध्दा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
यावेळी संपर्क प्रमुख विश्‍वासराव साळुंखे, दिनेश बर्गे, प्रा. भानुदास कोरडे, दिनेश देवकर, महिपतराव डंगारे, अनिल किर्वे, राकेश शेवते, मुगुटराव कदम, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी सत्रे व शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.