मुंबई -भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जात आहे. तेथे भारतीय संघ मालिका जिंकेल. मात्र, आता आम्हाला असे फुटकळ मालिका विजय नको आहेत. जिथे जिंकायला हवे होते तिथे तुम्ही साफ निराशा केली. वेस्ट इंडीजचा संघ पूर्वीसारखा बलाढ्य मानला जात नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतील पराभव भारतीय चाहते वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयाने विसरणार नाहीत, असेही गावसकर म्हणाले. जागतिक क्रिकेटमध्ये आजही ऑस्ट्रेलियाचा संघच बलाढ्य मानला जातो. त्यातही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या प्रवासात भारतीय संघाने सातत्य राखत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे हा सामना जिंकणे गरजेचे होते. या संपूर्ण सामन्यात विराट कोहलीसह सर्वच प्रमुख फलंदाजांनी साफ निराशा केली. जागतिक विजेतेपद गमवायचे व वेस्ट इंडीजसारख्या दुबळ्या संघाविरुद्धचे विजय साजरे करायचे आम्हाला पटत नाही. ज्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आजवर म्हणजे गेल्या 10 वर्षांत आपण विजेतेपद मिळवू शकलो नाही, त्याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. खेळाडूंना विश्रांती द्यायची व दुबळ्या संघाविरुद्ध जिंकायचे हे धोरणच मुळात चूक आहे. त्यामुळे अशा दौऱ्यांनाच काही अर्थ राहात नाही, असेही गावसकर यांनी म्हटले आहे. मी खेळत असताना एका संघाविरुद्ध आम्ही सगळे मिळून 42 धावांत गारद झालो, त्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये जे वातावरण होते ते शब्दांत सांगणे कठीण आहे. आम्हाला प्रत्येकाला आपल्या खेळाची लाज वाटली होती. मात्र, त्या स्थितीतून आम्ही बाहेर आलो व पुढील सामने जिंकले ते त्याच संघाला पराभूत करत. त्यावेळी आमचा आत्मविश्वास वाढला. आता वेस्ट इंडीज वगैरे संघांना पराभूत करून काही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही ऑस्ट्रेलियाला धूळ चारत नाही तोपर्यंत आमचेच काय चाहत्यांचेही समाधान होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. रोहित, कोहली व पुजारावर संताप कर्णधार म्हणून तसेच एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा साफ चुकला. त्याची संघ निवड चुकली. आता त्यानेच यावर विचार केला पाहिजे. अर्धशतकाला केवळ एक धाव हवी असताना कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून तो जागतिक कीर्तीचा फलंदाजच वाटला नाही. त्याला आपल्या तंत्रापेक्षा मानसिकतेवर सुधारणा करावी लागणार आहे. काउंटी स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असूनही पुजाराकडून अशी कामगिरी होत असेल तर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असून, त्याच्या जागी नवोदिताला संधी देणे योग्य ठरेल, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.