निरर्थक विषयावर बोलणेच नको; भोंग्यांच्या वादावर नितीश कुमार यांची भूमिका

पूर्णिया – धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, भोंग्यांच्या वादावर भूमिका मांडताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निरर्थक विषयावर बोलणेच नको, अशी प्रतिक्रिया दिली.
भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तरप्रदेशातील अनेक धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवण्यात आले. ते योगी मॉडेल बिहारमध्येही राबवण्यात यावे, अशी मागणी बिहारमधील भाजप नेते करू लागले आहेत. त्याविषयीचा प्रश्न शनिवारी पत्रकारांनी नितीश यांना विचारला. मात्र, भोंग्यांच्या विषयाला अधिक महत्व देण्याचे नितीश यांनी टाळले.
बिहारमध्ये आम्ही कुठल्याच धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. ते सर्वांनाच ठाऊक आहे. मुद्दे उपस्थित करणे हे आपले काम असल्याचे काही लोकांना वाटते आणि ते त्याप्रमाणे कृती करत असतात, असे नितीश म्हणाले. त्या वक्तव्यातून नितीश यांनी एकप्रकारे भोंग्यांचा विषय पुढे करणाऱ्या भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, नितीश यांचा जेडीयू आणि भाजप बिहारमध्ये एकत्रितपणे सत्तेवर आहेत.





