“माझ्या समाजाच्या लेकरांना कलंक लागू देऊ नका, लढायला शिका”; मनोज जरांगेंचे आवाहन

Manoj Jarange Dasara Melava 2024 | मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा झाला. या मेळाव्यादरम्यान जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मेळावासाठी राज्यभरातून विराट गर्दी झाली आहे. यावेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे मनोज जरांगे यांनी आभार मानले. याशिवाय त्यांनी राज्य सरकारवरही हल्लाबोल केला. येथे जमलेली नुसती गर्दी पाहूनच समोरच्यांचा कार्यक्रम होईल,’ असा टोला जरांगे यांनी लगावला.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला संपवण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आले. मला पूर्ण घेरलं आहे. मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे.”
पुढे ते म्हणाले की, “तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष, नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. लढायला शिका. येथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत. पण अन्याय होत असल्यास उठाव करायचा हे संविधानाने शिकवले आहे. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे.”
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे यांचा लढा सुरु आहे. सगेसोयरेंची अधिसूचना लागू करून सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषण केले. मात्र, सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यांनी आतापर्यंत जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही.
हेही वाचा :




