शिरूर -शहरामध्ये करोनाबाधित रुग्ण सापडला असल्याची अफवा पसरली असून, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या चर्चेचे खंडन केले आहे. शिरूरमध्ये कुठलाही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही व नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असा मेसेज व्हॉट्स ऍपवर सोडल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आली.
शिरूर शहरात लॉकडाऊन काळात शेकडो नागरिक पुणे, मुंबई व इतर हॉटस्पॉट भागातून शिरूर शहरात आले आहेत; परंतु अद्याप एकही करोना बाधित रुग्ण सापडला नाही. काही प्रमाणात शिरूर शहरात लॉकडाऊन शिथील केले आहे. त्यामुळे शहरात काही प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
शहरातील अनेक भागातील दुकाने उघडी आहेत; परंतु शासनाच्या व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहतील असा आदेश आहे.
शहरातील काही शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडी असल्याने नगर परिषदेच्यावतीने ती आज बंद केली गेली. अफवा पसरवणारा कोणी सापडल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महेश रोकडे यांनी दिला आहे.