Cockroach Control: झुरळे दिसताच घाबरू नका! घरातील या वस्तूंनी मिळवा सहज सुटका
Cockroach Control झुरळांमुळे केवळ घर अस्वच्छ दिसत नाही, तर अन्नपदार्थ दूषित होण्याचा आणि विविध आजारांचा धोकाही वाढतो. बाजारात झुरळे मारण्यासाठी अनेक प्रकारची रसायने आणि स्प्रे उपलब्ध असले, तरी काही सोपे आणि घरगुती उपाय करूनही झुरळांचा त्रास कमी करता येतो.

Cockroach Control: पावसाळा सुरू झाला की घरात झुरळांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. विशेषतः स्वयंपाकघर, सिंकखालील जागा, बाथरूम, स्टोअररूम आणि ओलसर कोपऱ्यांमध्ये झुरळे मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. झुरळांमुळे केवळ घर अस्वच्छ दिसत नाही, तर अन्नपदार्थ दूषित होण्याचा आणि विविध आजारांचा धोकाही वाढतो. बाजारात झुरळे मारण्यासाठी अनेक प्रकारची रसायने आणि स्प्रे उपलब्ध असले, तरी काही सोपे आणि घरगुती उपाय करूनही झुरळांचा त्रास कमी करता येतो.
तमालपत्राचा वापर करा
झुरळांना तमालपत्राचा वास सहसा सहन होत नाही. त्यामुळे हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. काही सुकलेली तमालपत्रे बारीक करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर स्वयंपाकघरातील कोपरे, सिंकखालील जागा, गॅसच्या मागील भागात, कपाटांच्या कडा आणि झुरळे दिसणाऱ्या ठिकाणी शिंपडा. या वासामुळे झुरळे त्या ठिकाणापासून दूर राहतात.
कडुनिंबाचे तेल किंवा पावडर वापरा
कडुनिंब हा नैसर्गिक कीटकनाशक म्हणून ओळखला जातो. पाण्यात कडुनिंबाचे तेल मिसळून त्याचा स्प्रे तयार करा आणि झुरळे लपतात त्या ठिकाणी फवारा. तसेच कडुनिंबाची पावडरही कोपऱ्यांमध्ये टाकू शकता. यामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास मदत होते.
पुदिन्याच्या तेलाचा स्प्रे
पुदिन्याचा तीव्र सुगंध झुरळांना आवडत नाही. एका स्प्रे बाटलीत पाणी घेऊन त्यात १० ते १५ थेंब पुदिन्याचे तेल मिसळा. हा स्प्रे स्वयंपाकघर, सिंक, बाथरूम आणि झुरळे दिसणाऱ्या ठिकाणी फवारल्यास झुरळे दूर राहण्यास मदत होते.

Cockroach Control Tips
बोरिक अॅसिडचा वापर करताना काळजी घ्या
बोरिक अॅसिड, थोडे पीठ आणि साखर एकत्र करून लहान गोळे तयार करून ते झुरळे येणाऱ्या ठिकाणी ठेवले जातात. हा उपाय अनेकजण वापरतात. मात्र, बोरिक अॅसिड हे रसायन असल्याने घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर हा उपाय अत्यंत काळजीपूर्वक करावा. त्यांच्या आवाक्याबाहेरच हे गोळे ठेवावेत.
कचरा साचू देऊ नका
घरातील कचरा जास्त वेळ साचून राहिला तर झुरळांना अन्न आणि आश्रय मिळतो. त्यामुळे कचऱ्याचा डबा रोज रिकामा करा आणि स्वच्छ ठेवा. कचऱ्यामुळे घरात दुर्गंधीही निर्माण होते आणि कीटक वाढण्याची शक्यता वाढते.
रात्री खरकटी भांडी ठेवू नका
अनेक जण रात्रीची खरकटी भांडी सकाळपर्यंत तशीच ठेवतात. मात्र, यामुळे झुरळे आणि इतर कीटक आकर्षित होतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी सर्व भांडी स्वच्छ धुण्याची आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याची सवय लावा.
घर स्वच्छ आणि कोरडे ठेवा
झुरळांना ओलसर आणि अंधाऱ्या जागा अधिक आवडतात. त्यामुळे सिंकमधील गळती, बाथरूममधील पाणी किंवा ओलसर कोपरे शक्य तितके कोरडे ठेवा. तसेच भिंतीतील भेगा आणि छिद्रे बंद केल्यास झुरळे लपण्याची जागा कमी होते.
हे घरगुती उपाय नियमितपणे केल्यास झुरळांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, झुरळांची संख्या खूपच वाढली असेल तर तज्ज्ञांची मदत घेणे अधिक योग्य ठरू शकते.





