‘त्यावेळी’ एकही आमदार आणू शकले नाहीत अन् आमचे आमदार घेऊन जाण्याची भाषा करतात”

कोथरूड – “मी कोल्हापूरला जाणार म्हटल्यावर माझ्या हितचिंतकांनी लगेच हुरळून जाऊ नये. मी “पळपुटा’ नाही, “पाटील’ आहे. त्यामुळे “मी ज्या मिशनवर आलोय ते पूर्ण झाल्याशिवाय कोल्हापूरला जात नसतो’, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. मात्र, हे विरोधक स्वपक्षातील असतील तर त्यांच्यासाठी हा “इशारा’ ठरू शकतो.
“देवेंद्रजी मी कोल्हापूरला पुन्हा जाणार आहे’, या चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्याबाबत स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की, कोल्हापूरला जातो म्हटल्यावर अनेकांना असे वाटले असेल की पाटील उद्या सकाळीच बॅगा भरून पहिल्या बसने कोल्हापूरला जातील. मात्र, माझ्या हितचिंतकांनी जास्त हरळून जाऊ नये, पक्षाने मला ज्या मिशनवर पाठविले ते पूर्ण झाल्याशिवाय मी जात नाही. भाजपमधील अनेक नेते, पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, तसेच अन्य विषयांवर अजित पवार यांनी केलेल्या व्यक्तव्याबाबत पाटील यांना विचारले असता, अजित पवार ज्यावेळी आमच्यात आले, त्यावेळी 28 आमदार असल्याचे सांगितले. मात्र, त्यातला एकही आमदार ते आणू शकले नाहीत आणि आमचे आमदार, पदाधिकारी घेऊन जायची भाषा करतात. शरद पवार यांना ज्यावेळी काही देण्याची वेळ येईल, त्यावेळी ते सुप्रिया सुळेंना देतील का तुम्हाला? याची काळजी करावी, असा सल्ला पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार फसवणूक करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
11 गावांचा विकास आराखडा तयार नाही, निधीचा पत्ता नाही. शहरातील सोयी-सुविधा मिळाव्या, म्हणून गावे शहरात येत आहे. पण, त्या सुविधा मिळणार नसतील तर काय उपयोग. आमचा गाव समावेशाला विरोध नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार “उदार राजे’ आहे. त्यामुळे गावे समावेश करताना त्यांनी उदार होऊन निधीही द्यावा.
– चंद्रकांत पाटील, आमदर, भाजप प्रदेशाध्यक्ष
“हेराफेरी’ दोन दिवसांत उघड करणार…
एजन्सीचा आम्हाला शोध लागला असून, प्रचंड हेराफेरी झाल्याचे समोर आले आहे. येत्या दोन दिवसात आम्ही ही हेराफेरी उघडकीस आणणार असून त्यावरून यांना बॅलेट पेपर का पाहिजे, हे स्पष्ट होईल. एकनाथ खडसे यांच्या ईडी नोटीशीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही कोणाच्याही मागे ईडी लावत नाही. या राज्य सरकारला लोकशाही मान्यच नाही. जे लोक ईडी लावल्यावर आम्ही सीडी लावू, असे म्हणतात, त्यांनी बिंधास्त सिडी लावावी, आम्ही घाबरत नाही, असा शब्दात पाटील यांनी खडसेंना इशारा दिला आहे. अगामी काळात मुंबईसह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





