नवी दिल्ली – “मॅडम कमिश्नर’ (MadamCommissioner) या पुस्तकात एकूण 38 प्रकरणे आहेत. येरवड्यातील जमिनीबाबत (Yerwada land) फक्त एकच प्रकरण आहे. त्यामुळे एकाच प्रकरणापुरते पुस्तकाला संकुचित करू नका, असे आवाहन माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (meera borwankar) यांनी केले. “मॅडम कमिश्नर’ या पुस्तकातील एका प्रकरणात अजित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाने राज्यातील राजकारण तापले आहे. यानंतर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मीरा बोरवणकर म्हणाल्या, पुस्तकात 38 प्रकरणे आहेत. यामध्ये एकतर्फी प्रेमात तरुणीची झालेली हत्या, जळगाव सेक्स स्कॅंडल, मानवी तस्करी अशी विविध प्रकरणे या पुस्तकात आहेत. एकाच प्रकरणाबद्दल मला विचारणा करू नका. एकाच प्रकरणाबद्दल त्याला संकुचित करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. हे पुस्तक प्रशासन, उत्कृष्ट तपास, मुली-महिलांचे शोषण अशा विविध मुद्यांवर आहे. हे पुस्तक सर्वांनी विशेषत: मुलींनी, महिलांनी वाचावे, असेही बोरवणकर यांनी म्हटले.
तसेच पोलीस, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि खासगी बिल्डर यांच्या हितसंबंधांची एक साखळी आहे. यापासून नागरिकांनी सावध राहावे. शासकीय जमिनीचा वापर हा शासकीय कार्यालये, गृहनिर्माण आणि इतर सार्वजनिक हितासाठी वापरली जावीत, असेही त्यांनी म्हटले.
आरोपांबाबत केला खुलासा
अजित पवार यांच्या प्रकरणाबाबत त्यांनी खुलासा केला की, अजित पवार यांनी लिलाव केला नाही, हे सत्य आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीच्या लिलावासाठी सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली. माझ्याकडे कार्यभार असल्याने जमिनीवरील ताबा सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. अजित पवारांनीदेखील हाच आग्रह धरला होता. लिलाव झाल्याने आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू करा, असे त्यांनी म्हटले. मात्र, माझ्या दृष्टीने ती जागा महत्त्वाची होती. पुणे पोलीस आयुक्तालय, पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी ही जागा वापरता आली असती. त्यामुळे मी त्या तीन एकर जमिनीच्या लिलावाला आक्षेप घेत हस्तांतरणाला विरोध केला असल्याचे त्यांनी सांगितले.