“शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, एका दिवसात प्रश्न मार्गी लावा;” शरद पवारांची मागणी

Sharad Pawar | विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचे मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 10 महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
शासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी आझाद मैदानावर शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. ८ व ९ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे राज्यातील विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
रोहित पवार मंगळवारी रात्रीपासून आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले असून नुकतेच शरद पवार देखील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. यावेळी शरद पवार यांनी ‘ज्ञानदानाची जबाबदारी असणाऱ्यांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, एका दिवसाच्या आत शिक्षकांच्या प्रश्न मार्गी लावा,’ अशी मागणी सरकारला केली आहे. Sharad Pawar |
शरद पवार नेमकं काय म्हणाले ?
शरद पवार म्हणाले की, “शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नाही. तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे. ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका. शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून आपण काम करू, एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा. गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केलं असून निधीची तरतूद कशी करायची मला माहित आहे,” असेही त्यांनी सरकारला सुनावले. Sharad Pawar |
दरम्यान, राज्यात जवळपास ५ हजार ८४४ खासगी अंशत: अनुदानित शाळा आहेत. या शाळांना टप्पा अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानुसार शाळांना २० टक्के याप्रमाणे टप्प्याटप्याने अनुदान मिळणार, या आशेवर हजारो शिक्षक असताना त्यांच्या पदरी अद्यापही निराशा आहे.
हेही वाचा:
Ajit Pawar : अजित पवारांचा पक्षातील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र! म्हणाले…





