Pimpri : निसर्गसौंदर्य अनुभवताना अपघाताला आमंत्रण नको

कान्हे : मावळ तालुक्याच्या अंदर मावळ, पवन मावळ आणि नाने मावळ परिसरात पावसाळी पर्यटनाचा हंगाम सध्या भरात आहे. हिरव्यागार डोंगररांगा, वाहणारे धबधबे, धुक्याची चादर आणि थंड हवामान या साऱ्या निसर्ग सौंदर्याच्या अनुभवासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे आकर्षित होत आहेत.
मात्र, रोमांचाचा हा अनुभव काही वेळा जीवावर बेततो आहे. गेल्या काही वर्षांत धबधबे, ओढे परिसरातील अपघातांमध्ये तरुणांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिकांनी पर्यटकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
कुंडमळा, अंदर मावळातील धरणबाजार, तसेच इतर डोंगराळ भागात तरुणांच्या बुडून मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी पावसाळ्यात समोर येत आहेत. भर पावसात पाण्याचा वेग, निसरडे रस्ते, घसरणाऱ्या पायवाटा आणि खोलीचा अंदाज न येणारे जलप्रवाह हे सगळे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः ट्रेकिंग, सेल्फी घेणे, धबधब्यांखाली उभे राहणे, ओढे ओलांडणे यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
प्रशासनाने काही धोकादायक पर्यटन स्थळांवर सुरक्षा सूचना फलक लावले असून, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनीही पर्यटकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच स्थानिक मार्गदर्शकांच्या मदतीने सुरक्षित मार्गदर्शन घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. पावसाळी पर्यटन म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्याची संधी आहे, पण काही क्षणांचा निष्काळजीपणा आयुष्यभरासाठी दु:खद ठरू शकतो. म्हणूनच सुरक्षितता हीच खरी सहल आहे हे लक्षात ठेवूनच प्रवास करणे गरजेचे आहे.
खबरदारीचे सोपे उपाय
पावसाळी पर्यटन करताना पर्यटकांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. या काळात निसर्ग जितका सुंदर वाटतो, तितकाच तो बेभरवशाचा आणि धोकादायक असतो. त्यामुळे खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळावे. माहीतगार व्यक्तीशिवाय अपरिचित स्थळी जाऊ नये. पावसाळी भटकंती, ट्रेकिंग शक्यतो ग्रुपने करावे. संयोजक अनुभवी आणि प्रशिक्षित सोबत असावा.
पावसापासून संरक्षण देणारे कपडे, चांगल्या दर्जाचे बूट वापरावेत. संयोजकांकडे चढाईसाठी आवश्यक साहित्य, प्रथमोपचाराच्या साहित्याची खात्री करावी. आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलिस स्टेशन, रुग्णालयांचे संपर्क क्रमांक जवळ ठेवावेत. कुठेही जाण्यापूर्वी कुटुंबीयांना ट्रेकिंगच्या पूर्ण नियोजनाची कल्पना द्यावी. पावसाळ्यात एकट्याने भटकंती टाळावी.
दरडीचा धोका लक्षात घेऊन कडेकपारींचा अंदाज घेऊन चालावे. धाडसाच्या प्रयत्नात ओढे, नाले ओलांडणे टाळावे. पाण्याला प्रचंड वेग असल्याने धबधब्यांखाली उभे राहू नये. त्या ठिकाणी लिहिलेल्या सूचनांचे फलक व त्याचे पालन करावे. प्रवास करत असताना वेडी वाकडी वळणावर वाहने सावकाश चालवावी.





