पिंपरी : पिंपरी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आनंदाला मुरड घालत आखाड पार्ट्या साजऱ्या करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील नागरिकांशी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
आयुक्त म्हणाले, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांना तो आपल्या पद्धतीने साजरा करायचा असतो. त्यामध्ये मग पार्ट्यांचे नियोजन केले जाते. यामध्ये परिचित, अपरिचित मंडळी एकत्र येतात. त्यामध्ये मास्क उतरविणे, एकमेकांना हात मिळवणे. यामुळे नकळत करोनाचा फैलाव होऊ शकतो.
शहरातील नागरिक अजूनही करोना विषाणूला गांभीर्याने घेत नाहीत. नियम व शिस्त पाळत नाहीत. 14 ते 18 जुलै या लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस व महापालिका प्रशासनाने नागरिकांकडून 1 कोटी पेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. दंड आकारणे हे भूषावह नाही. शहरातील करोना रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये 8 हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र ते करोना विषाणूचे वाहक होते.
शहरातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच यावर्षी आखाड पार्ट्या करू नये असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले.