पुणे -शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाकडून आदेश येताच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, शेतकऱ्यांवर अतिवृष्टी व पूरपरिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करावी, असेही सिंघल यांनी सांगितले. दरम्यान, चालू बिल भरण्यासाठी महावितरणतर्फे शेतकऱ्यांकडे तगादा सुरू होता. चालू बिल न भरल्यास कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. यातूनही अनेकांनी चालू बिल भरली आहेत. कृषीपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नये असा आदेश काढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.