Satara : निवडणुकीतील अपयशाने खचून जाऊ नका

सातारा : विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काॅंग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीची तयारी करावी. अपयशाने खचून जाऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
सातारा जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयात पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर, ॲड. श्रीकांत चव्हाण, ॲड. दत्ता धनवडे, निवास थोरात, अन्वर पाशा खान, रजनी पवार, संदीप माने, संदीप माने, मनोजकुमार तपासे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विधानसभा निवडणुकीतील अपयशाच्या कारणांवर विचारविनिमय करण्यात आला. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची निवडणूक होणार आहे.
यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आतापासूनच सतर्क राहवे, विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ताकदीने काम करावे लागेल, पक्ष मजबूत करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरावर बैठक घेऊ, असे यावेळी सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाऊ नका, अपयश ढकलून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामाेरे जायचे आहे. कारण या निवडणुकाच लोकशाहीचा पाया आहेत. यासाठी तयारी करा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.





