कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची मागणी; कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करू नयेत, यासाठी शासनाकडे आग्रह धरण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे. यावर शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. महासंघाच्या कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक नुकतीच झाली. यास आमदार विक्रम काळे, सुधीर तांबे, महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, प्रा. एस.टी. पवार, सरचिटणीस प्रा. लक्ष्मण रोडे आदींनी सहभाग घेतला. “करोनाचा प्राधुर्भाव कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत,’ असे प्रा. आंदळकर, प्रा. रोडे यांनी सांगितले. आगामी काळातही विविध मागण्यांबाबत आंदोलनाचा पवित्रा घ्यावाच लागणार आहे, असे प्रा. फाजगे म्हणाले. राज्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे सध्या आंदोलन करू नका. दि.15 जूनला शाळा सुरू करता येणार नाहीत. शाळा उशिरा सुरू झाल्या, तरी सुट्ट्या रद्द करुन कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. – विक्रम काळे, आमदार. बारावीपर्यंतचे शिक्षण देणे शासनाची जबाबदारी आहे. अनुदानित शाळा असल्याशिवाय मुलींचे शिक्षण होऊ शकणार नाही. कनिष्ठ महाविद्यायांत विद्यार्थी संख्या जास्त असल्याने अंतर ठेवून वर्ग सुरू करता येणार नाहीत. ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही – सुधीर तांबे, आमदार. अकरावीच्या किमान परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बारावीमध्ये प्रवेश द्यावा. करोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावीचे प्रवेश करण्याचे अधिकार संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना द्यावेत, करोना आपत्ती व्यवस्थापनामध्ये शिक्षकांना शिक्षकांना शोभतील अशीच कामे द्यावीत. – प्रा. डॉ. संजय शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ