Crime News : पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरातील दानपेट्या फोडल्या
Crime News : याप्रकरणी मंदिराचे पुजारी पीर योगी अजयनाथ महाराज यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 16 तारखेला रात्री एक ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्या बाहेर नेऊन फोडल्या आणि त्यातील रक्कम काढून रिकाम्या पेट्या मंदिर परिसरातच टाकून दिल्या.

जुन्नर : दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरणार्या जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात चोरट्यांनी दोन दानपेट्या फोडून त्यातील सुमारे 24 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. मंदिरातील चोरीची ही तिसरी घटना असून, यामुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मंदिराचे पुजारी पीर योगी अजयनाथ महाराज यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 16 तारखेला रात्री एक ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्या बाहेर नेऊन फोडल्या आणि त्यातील रक्कम काढून रिकाम्या पेट्या मंदिर परिसरातच टाकून दिल्या. ब्रह्मनाथ मंदिरातील नवनाथ मंदिराचा पहिला वर्धापन दिन सोहळा 16 तारखेला आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री एक वाजेपर्यंत मंदिरात भजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फोडल्या. मंदिरातील चार दानपेट्यांपैकी तीन पेट्या फोडण्यात आल्या असून, त्यातील दोन पेट्यांमधील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरीची ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाली आहे. जुन्नर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुखवटे चोरीनंतर पुन्हा दानपेट्यांना लक्ष्य
यापूर्वीही या मंदिरातील देवाचे मुखवटे चोरीस जाण्याची घटना घडली होती. तसेच दानपेट्या फोडण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून परिचित असलेले पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिर राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. पुढील वर्षी कुंभमेळा होणार असल्याने मंदिरात भाविकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मंदिरातील चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.





