Rajnath Singh- सशस्त्र सेना ध्वज दिन (एएफएफडी ) निधीमध्ये सढळ हस्ते योगदान देऊन वीर पत्नी , माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग होण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 7 डिसेंबर रोजी साजरा होत असलेल्या सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राजनाथ सिंह यांनी संदेश दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून , माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासह त्यांना पुरवण्यात येणारे सहाय्य, पुनर्वसन आणि उपचार यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे राजनाथ सिंह यांनी या संदेशात म्हटले आहे. या सगळ्यांना आपल्या सर्वांकडून योग्य सन्मान मिळावा हे सुनिश्चित करणे हे आमचे सामूहिक कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. सशस्त्र दलातले जवान शिस्त, समर्पण आणि देशभक्तीने सीमांचे रक्षण करतात, तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी मदत आणि बचाव कार्यात तसेच जगभरातील शांतता मोहिमांमध्ये मोलाचे योगदान देतात, यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. मातृभूमीची सेवा करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली.राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अनेकांना शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आले आहे अशा सैनिकांसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनतेने सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान सुनिश्चित करावे आणि इतरांना या उदात्त कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले. या दिनाच्या निमित्ताने संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनीही सशस्त्र दलातील जवान , माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ,सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या माध्यमातून लोकांना मिळते. जनतेने सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान देण्याचे आणि कल्याणकारी योजनांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.