वॉशिंग्टन – अमेरिकेतील काही तांदूळ उत्पादकांनी भारत हा अमेरिकेत तांदूळ उत्पादन मूल्यापेक्षा कमी किमतीत विकत असल्याची तक्रार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली. ट्रम्प यांनी लगेच या तांदळावर आयात शुल्क लावून भारतीय तांदळाची आयात रोखणार असल्याचे या शेतकर्यांना सांगितले. यामुळे अमेरिका भारतीय तांदळावर आणखी शुल्क लावण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. या बैठकीत अमेरिकेतील एका शेतकर्याने सांगितले की, भारतासह इंडोनेशिया, चीन, थायलंड अमेरिकेत कमी किमतीवर तांदूळ विकत असल्यामुळे अमेरिकन शेतकर्यांचे नुकसान होत आहे. तसेच ज्या बाजारपेठेत अमेरिकन तांदूळ जात होता तिथे चीन तांदूळ विकत असल्यामुळे अमेरिकन शेतकर्यांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार अनेक वर्षापासून घडत आहे आणि यावर्षी तो जास्त वाढला आहे असे शेतकर्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी सांगितले की भारताविरोधात 50% आयात शुल्क लावूनही हा प्रश्न आहे का?. यावर शेतकर्यांनी होकारअर्थी उत्तरे दिल्यानंतर ट्रम्प यांनी भारता विरोधात आणखी आयात शुल्क तात्काळ लागू केले जाईल असे सांगितले. ट्रम्प म्हणाले की, तांदूळ विक्रीबाबत भारताला अपवाद करण्यात आले आहे का. यावर अधिकार्यांनी नाही असे सांगितले. मात्र ट्रम्प म्हणाले की भारताला अमेरिकेत तांदूळ स्वस्तात विकता येणार नाही. आयात शुल्क वाढवून हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. व्यापार कराराकडे दुर्लक्ष अमेरिकन शेतकरी भारता विरोधात ट्रम्प यांच्याकडे तक्रार करत असतानाच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसन्ट यांनी सांगितले की, भारताबरोबर व्यापार करारावर चर्चा चालू आहे. या चर्चेवेळी हा प्रश्न उपस्थित केला जाईल असे बेसन्ट यांनी ट्रम्प यांना सांगितले. मात्र व्यापार कराराचा आणि भारत अमेरिकेत स्वस्त तांदूळ विकत असल्याचा काय संबंध आहे असे सांगून यावर शक्य तितक्या लवकर तोडगा काढणार असल्याचे ट्रम्न यांनी नमूद केले. विशेष म्हणजे अमेरिकन शिष्टमंडळ बुधवारी भारतात येणार असतानाच ट्रम्प यांनी भारता विरोधात उघड – उघड वक्तव्य केले आहे. त्यामुळे या चर्चेची फलनिष्पत्ती काय असू शकेल याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.