Donald Trump : गमावलेला भूभाग युक्रेन परत मिळवू शकतो; ट्रम्प यांच्या भूमिकेत आश्चर्यकारक बदल

न्यूयॉर्क : रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनने गमावलेला आपला भूभाग नाटोच्या मदतीने परत मिळवणे शक्य आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे युक्रेनला अमेरिकेकडून पुन्हा ठाम पाठिंबा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र युक्रेनने ट्रम्प यांच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी नाटोवर दबाव आणला तरच युक्रेन रशियाचे आक्रमण परतवून लावू शकेल, असे युक्रेनमधील रहिवाशांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये असलेल्या ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हे वक्तव्य केले आहे. रशियाची लष्करी ताकद आणि रशियाच्या अर्थकारणाबाबतही त्यांनी टिप्पणी केली आहे. रशियाच्या विमानांकडून नाटो सदस्य देशांच्या हवाई हद्दींमध्ये घुसखोरी होत असल्याने नाराज झालेल्या ट्रम्प यांनी नाटोच्या विमानांनी रशियाची विमाने पाडावीत, असे आवाहनही केले.
रशिया हे युद्ध आठवड्याभरात जिंकू शकले असते, असे म्हणून ट्रम्प यांनी रशियाच्या लष्करी सामर्थ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या युद्धामुळे रशियाच्या अर्थकारणावर इतका प्रचंड दबाव येतो आहे की युक्रेन हे युद्ध सहज जिंकू शकेल, असे ट्रम्प यांनी म्हटल्यामुळे युक्रेनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रशियाने २०१४ साली क्रिमियाचा ताबा घेतल्यापासून युक्रेनचा २० टक्के भूभाग बळकावला आहे. त्यानंतर २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर पूर्ण ताकदीनिशी आक्रमण केले आहे. रशियाने युक्रेनचे ३ प्रांत आपल्या नियंत्रणात आणले असून सार्वमत घेऊन हे प्रांत रशियाला जोडूनही घेतले आहेत.
ट्रम्प यांच्या भूमिकेत अनपेक्षित बदल
ट्रम्प यांच्या भूमिकेत झालेला हा बदल अनपेक्षित आहे. यापुर्वी ट्रम्प यांनी युक्रेनच्या विजयाबद्दल नकारात्मक वक्तव्य केली होती. त्यांनी पुतीन यांना अनुकूल भूमिकाच घेतली होती. जानेवारी महिन्यात अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी युक्रेनला तीन वर्षांपासून दिली जात असलेली लष्करी मदत थांबवली होती. त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चाही केली. युक्रेन नाटोमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असेही सांगितले. झेलेन्स्की यांनी रशियाला भूभाग देण्याबाबत वाटाघाटी कराव्यात असेही सुचवले होते. सोशल मीडियावर त्यांनी झेलेन्स्की यांना निवडणुकीशिवाय अध्यक्ष राहिलेले हुकुमशहा असेही संबोधले होते.





