वॉशिंग्टन : इस्रायल आणि अरब विश्वातील मुस्लिम देशांमध्ये करण्यात आलेल्या अब्राहम करारामध्ये सामील होण्यास कझाकस्तान सज्ज झाला आहे. या करारात सामील होण्याने मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्यास मदतच होणार आहे. अब्राहम करार ट्रम्प यांच्या पुढाकाराने त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये घडवून आणण्यात आला असल्यामुळे मध्यपूर्वेतील ट्रम्प यांचा प्रभाव आणखी वाढणार आहे. कझाकस्तानचे इस्रायलशी १९९२ पासूनचे राजनैतिक संबंध असून दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून खूप लांब अंतरावर आहेत. विशेषतः अब्राहम करारात सहभागी असलेल्या बहारिन, मोरोक्को, सुदान आणि युएइ या देशांच्या तुलनेत कझाकस्तान आणि इस्रायलमधील अंतर खूप जास्त आहे. तरी या करारात कझाकस्तान सहभागी होणे प्रतिकात्मकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते आहे. अब्राहम कराराने अरब विश्वातील मुस्लिम देशांनी इस्रायलशी असलेले शत्रुत्व संपवून सामान्य संबंध स्वीकारणे मान्य केले आहे. कझाकस्तान हा पुर्वीच्या सोव्हिएत रशियाचा भाग होता. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर अल्पावधीतच कझाकस्तानला स्वातंत्र्य मिळाले होते. अब्राहम करारात कझाखस्तान सामील झाल्याने सोव्हिएत रशियाच्या प्रभावातून बाहेर पडल्याचा संकेतही विश्वाला दिला जाणार आहे. कझाकस्तान अब्राहम करारात सामील होण्याची अधिकृत घोषणा अद्याप केली गेली नसली, तरी अमेरिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी या निर्णयाला अनौपचारिकपणे दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांनी कझाकस्तानच्या सामील होण्याला जगभरात पूल बांधण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हटले असून अब्राहम कराराद्वारे शांतता आणि समृद्धी स्वीकारण्यासाठी अधिक राष्ट्रे रांगेत असल्याचेही म्हटले आहे.