वॉशिंग्टन : आपल्या भाषणाचे जाणीवपूर्वक चुकीचे आणि फसवे संपादन करून बदनामी केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बीबीसी या ब्रिटीश वृत्तसंस्थेवर १०० अब्ज डॉलरचा खटला दाखल केला आहे. आपल्या ३३ पानी खटल्यामध्ये बीबीसीने खोटे, बदनामीकारक, फसवे, अपमानास्पद, प्रक्षोभक आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल दुर्भावना पसरवणारे उभे केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालामध्ये हस्तक्षेप आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचे बीबीसीने भासवल्याचा आरोपही केला गेला आहे. ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२४ रोजी केलेल्या भाषणातील परस्पर भिन्न वक्तव्ये बीबीसीने जोडली आणि ट्रम्प यांचे म्हणणे म्हणून चुकीचा अर्थ निघेल असे सादर केले, असाही दावा केला गेला आहे. ट्रम्प यांच्या खटल्यावर बीबीसीने त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या भाषणाचे चुकीचे संपादन केल्याबद्दल बीबीसीने गेल्याच महिन्यात ट्रम्प यांची माफी मागितली आहे. मात्र ट्रम्प यांनी कायदेशीर कारवाईची धमकी दिल्यानंतर जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप बीबीसीने फेटाळून लावला. ट्रम्प यांच्या भाषणाचे चुकीचे संपादन झाले होते, हे बीबीसीचे अध्यक्ष समीर शहा यांनी मान्य केले आणि या चुकीबद्दल बीबीसीचे वरिष्ठ कार्यकारी आणि न्यूज विभागाच्या अध्यक्षांचे राजीनामेही घेण्यात आले आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्या ज्यो बायडेन यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाण्यापुर्वी ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये घुसून धुडगूस घालण्यापुर्वी ट्रम्प यांनी हे भाषण केले होते. मात्र त्यामध्ये ट्रम्प यांच्या २०२१ मधील भाषणातील ३ वक्तव्ये जोडली गेली होती. त्यामुळे ट्रम्प यांनीच आपल्या समर्थकांना धुडगूस घालण्याची चिथावणी दिल्याचा भास होत होता.