वॉशिंग्टन : क्युबाला तेल पुरवणाऱ्या देशांमधील उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या कार्यकारी आदेशांवर ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली. तुर्तास तरी क्युबाला तेल पुरवठा करणारी जहाजे पाठवणे थांबवले आहे, असे मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी म्हटले आहे. हा निर्णय मेक्सिकोने स्वतःहून घेतला आहे. मेक्सिकोने यासारखे काही निर्णय अमेरिकेच्या दबावा खाली घेतले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. क्युबाला तेल पुरवठा करणाऱ्या कोणत्या देशांवर आयात शुल्क लावले जाणार आहे आणि किती टक्के आयात शुल्क लावले जाणार आहे, हे या कार्यकारी आदेशामध्ये स्पष्ट नमूद केले गेलेले नाही. क्युबाला तेल पुरवठा करू नये, यासाठी अमेरिकेकडून सातत्याने मेक्सिकोवर दबाव आणला जातो आहे. Donald Trump Tariffs | अमेरिकेकडून (Donald Trump) क्युबावर यापुर्वीच कठोर आर्थिक निर्बंध घातले गेले आहेत. या निर्बंधांमुळे क्युबाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. क्युबा हा व्हेनेझुएलाचा मित्र देश आहे. अमेरिकेने लष्करी कारवाई करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडून अमेरिकेत नेल्याच्या कारवाईवर क्युबाने जोरदार टीका केली होती. त्यानंतर क्युबामधील सरकार कोसळण्याच्या बेतात असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. अमेरिकेकडून वाढीव आयात शुल्क लावण्याच्या धमकीवर क्युबाने जोरदार टीका केली आहे. हे आयात शुल्क म्हणजे अमेरिकेचे आक्रमण असल्याचे क्युबाने म्हटले आहे. इंधनाची नाकाबंदी करून अमेरिका क्युबाला ब्लॅकमेल करत असल्याची टीकाही क्युबाने केली आहे.