ट्रम्प यांचा धडाकेबाज निर्णय, इस्त्रायलप्रमाणे बनवणार ‘आयर्न डोम’, अमेरिकेला नक्की कोणत्या देशापासून धोका?

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून एकामागोमाग एक मोठे निर्णय घेत आहेत. सत्तेत परतल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर सही केली होती. तसेच, मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी जाहीर केली होती. आता त्यांनी नवीन आदेश देत इस्त्रायलप्रमाणे आयर्न डोम प्रणालीची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आयर्न डोम प्नणाली तयार करण्याचे आश्वासन दिले होते. पुन्हा स्तेत आल्यास इस्रायलप्रमाणे आयर्न डोमची निर्मिती केली जाईल, असे ते म्हणाले होते. आता त्यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना लवकरात लवकर आयर्न डोम प्नणालीच्या निर्मितीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
रिपब्लिकन काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, आपल्याला तात्काळ अत्याधुनिक आयर्न डोम क्षेपणास्त्र डिफेन्स शील्ड तयार करण्याचे काम सुरू करायला हवे. ही प्रणाली अमेरिकेच्या नागरिकांचे संरक्षण करेल. तसेच, या प्रणालीची अमेरिकेतच निर्मिती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबत ट्रम्प लवकरच कार्यकारी आदेश देखील जारी करणार आहे.
आयर्न डोम प्रणाली काय आहे?
हमास आणि इराणने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर आयर्न डोम प्रणाली चर्चेत आली होती. इस्त्रायलवर डागण्यात आलेल्या शेकडो रॉकेटला आयर्न डोम प्रणालीद्वारे हवेतच नष्ट करण्यात आले होते. ही एक अँटी मिसाइल सुरक्षा प्रणाली आहे.
इस्रायलने 2011 मध्ये देशात आयर्न डोम प्रणालीचा वापर सुरू केला. ही इस्त्रायलची सर्वात शक्तिशाली संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे हवाई हल्ल्यांपासून नागरिकांचे रक्षण होते. जर १०० रॉकेट डागण्यात आले, तर त्यापैकी जवळफास 90 रॉकेट हवेतच नष्ट करण्याची या प्रणालीत क्षमता आहे.
ही प्रणाली रडारच्या माध्यमातून कार्य करते. शत्रूने रॉकेटच्या माध्यमातून हल्ला केल्यास ही प्रणाली रडारच्या माध्यमातून त्याचा शोध घेते व ट्रॅक करते. त्यानंतर कंट्रोल सिस्टम इम्पॅक्ट प्वाइंटचा अंदाज लावून क्षेपणास्त्र निकामी करण्यासाठी रॉकेट सोडते. यामुळे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होतात.
ही नेक्स्ट जनरेशन संरक्षण प्रणाली अमेरिकेचे बॅलिस्टिक, हायपरसॉनिक, आधुनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि इतर हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करेल. सध्या जगभरात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत. रशिया, चीन आणि इराणसह अनेक देशांशी अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अमेरिकेकडून ही संरक्षण प्रणाली तयार केली जात आहे. या प्रणालीच्या परिणामकारकतेमुळे आता ट्रम्प यांनी देखील देशात याची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत.





