Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची हत्या करण्याचा कट केल्याबद्दल इराणशी संबंधित असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये इराणच्या कुडस फोर्सचा कमांडर कासेम सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह अमेरिकेतल्या अन्य राजकीय नेत्यांची हत्या करण्याचा कट या व्यक्तीने केला होता. आसिफ रझा मर्चंट असे या ४८ वर्षीय पाकिस्तानी नागरिकाचे नाव असून त्याला ब्रुकलिनमधील फेडरल ज्युरींनी शुक्रवारी हत्येसाठी भाडोत्री मारेकऱ्याला सुपारी देणे आणि दहशतवादी कृत्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. मर्चंट याला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ट्रम्प यांची हत्या करण्याच्या हेतूनेच मर्चंट अमेरिकेत आला होता, असे यूएस ऍटर्नी जनरल पमेला बोंडी म्हणाल्या. तो एक इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचा प्रशिक्षित सदस्य असून २०२४ मध्ये रिव्होल्युशनरी गार्डनेच त्याला राजकीय व्यक्तींच्या हत्येची तयारी करण्यासाठी अमेरिकेत पाठवले असल्याचे त्याने कबूल केले असल्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष ज्यो बायडेन आणि संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेले यांच्यापैकी कोणाला तरी ठार मारायचे होते, असे मर्चंटला सांगितले गेले होते. पण आपले लक्ष्य ट्रम्प हेच असणार होते, असे त्याच्या लक्षात आले होते. त्यानुसार मर्चंट एप्रिल २०२४ मध्ये अमेरिकेत आला. त्याने जूनमध्ये काही मारेकऱ्यांशी संपर्कही साधला. पण हे मारेकरी म्हणजे अमेरिकेतील कायदा रक्षण अधिकारीच होते. त्यांनी जुलै २०२४ मध्ये देशाबाहेर निघून जाण्यापुर्वीच मर्चंटला अटक केली होती.