Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय ब्रिटनच्या दौऱ्यावर

विंडसर (ब्रिटन) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर दाखल झाले असून विंडसर राजवाड्यामध्ये त्यांनी राजे चार्ल्स यांची भेट घेतली. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी कॅथरीन अध्यक्ष आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना भेटण्यासाठी उपस्थित होते. या प्रसंगी राजघराण्याच्या शाही सुरक्षा रक्षकांच्या पथकाने ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे यथोचित स्वागत केले.
मंगळवारी उशिरा ट्रम्प लंडनमध्ये पोहोचले. ब्रिटनमध्ये परत येणे आपल्याला खूप आवडले आणि हे एक अतिशय खास ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले. राजे चार्ल्स हे आपले दीर्घकाळापासूनचे चांगले मित्र असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ट्रम्प यांच्याशी संवादासाठी राजे चार्ल्स यांनी दिलेल्या खास निमंत्रणावरून ट्रम्पयांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. हे निमंत्रण म्हणजे आपला विशेष बहुमान असल्याचे ट्र्म्प यावेळी म्हणाले.
आपल्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान ट्रम्प ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचीही भेट घेणार आहेत. यावेळी ब्रिटन आणि अमेरिकेदरम्यानच्या तंत्रज्ञानविषयीच्या नवीन कराराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. युक्रेन, मध्य पूर्व आणि नाटोच्या भविष्याबद्दल मतभेद असूनही ट्रान्स-अटलांटिक बंध मजबूत असल्याचे दाखविण्यास मदत होईल अशी आशा ब्रिटिश सरकारला आहे.
ब्रिटनच्या राजवाड्यामध्ये दुसऱ्यावेळी भेट देण्याचा मान आतापर्यंत अन्य कोणत्याही जागतिक नेत्याला अथवा अमेरिकेच्या अन्य कोणाही राष्ट्रप्रमुखांना मिळालेला नाही. जागतिक नेते नेहमी ब्रिटनच्या राजघराण्याबरोबरच्या भेटीगाठी गुप्तपणे घेत असतात. या भेटीसंदर्भात ट्रम्प यांच्याकडून कोणतेही निवेदन प्रसिद्धीला दिले जाण्याची शक्यता नाही. तसेच ते ज्याप्रमाणे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ .यांनी ब्रिटनच्या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले होते. त्याप्रमाणे ट्रम्प यांचे संसदेत भाषणही होणार नाही.
एप्स्टिनचा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्यता
ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभुमीवर वकिंगहॅम राजवाड्यासमोर कोणतीही निदर्शने करायला बंदी घालण्यात आली आहे. जेफ्री एप्स्टिन संबंधित वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले जाऊ नयेत, अशी अपेक्षा पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावरून स्टार्मर यांनी अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत पीटर मॅन्डेल्सन यांना हटवले आहे. मात्र तरीही ब्रिटनच्या दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित केला जातोच आहे. लेड बाय डॉन्किज या गटाने ट्रम्प आणि एप्स्टिन यांचे चित्र विंडसर राजवाड्यावर प्रक्षेपित केले होते. या संदर्भात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.





