Donald Trump : शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणे हा अमेरिकेचा अपमान; डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

न्यूयॉर्क : सात जागतिक संघर्ष संपवल्यानंतरही जर आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही तर तो अमेरिकेचा मोठा अपमान होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी क्वांटिकोमध्ये लष्करी नेत्यांना दिलेल्या भाषणात ही टिप्पणी केली. गाझा संघर्ष संपवण्याच्या आपल्या योजनेचा संदर्भ त्यांनी दिला. हा संघर्ष आम्ही थांबवला आहे.
हमासला शांततेसाठीचा प्रस्ताव मान्य करावाच लागेल. जर त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही, तर ते त्यांच्यासाठी खूप कठीण होईल. पण सर्व अरब देशांनी, मुस्लिम देशांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. इस्रायलनेही हा प्रस्ताव मान्य केला आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. या प्रस्तावानुसार शांतता होणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.
जर सोमवारी जाहीर केलेली गाझा संघर्ष संपवण्याची त्यांची योजना यशस्वी झाली तर त्यांनी इतक्या महिन्यांत सोडवलेल्या संघर्षाची संख्या आठ होईल. हे खूप छान असेल, कोणीही ते कधीच केले नाही. त्याबद्दल तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळेल का नाही ? ज्यांनी काहीही केले नाही, त्यांना नोबेल पुरस्कार दिला जातो. मग अशा कामासाठी शांततेचे नोबेल का दिले जाऊ नये, असेही ट्रम्प म्हणाले.





