Donald Trump : क्युबाला रशियाकडून तेलाची मदत मिळण्यास हरकत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले स्पष्ट
क्युबाला रशियाकडून तेलाची मदत मिळण्यास काहीही हरकत नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे.

Donald Trump : क्युबाला रशियाकडून तेलाची मदत मिळण्यास काहीही हरकत नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे. अमेरिकेने क्युबाची सागरी नाकाबंदी केली असल्यानंतरही रशियाची तेलवाहक जहाजे क्युबाच्या किनाऱ्याजवळ बघितली गेली होती.
जर कोणाला गरज असली आणि कोणी मदतीसाठी तेलाची जहाजे पाठवली, तर आम्हाला त्याबद्दल काही आक्षेप नाही, असे ट्रम्प (Donald Trump) यांनी विमानात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
क्युबाच्या मदतीला रशियाचे ७ लाख ३० हजार बॅरल तेल असलेला टँकर क्युबाच्या बंदरात दाखल होणार असल्याचे रशियाच्या परिवहन मंत्रालयाने म्हटले होते. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर रशियाच्या या जहाजावर अमेरिका, युरोपीय संघ आणि ब्रिटनने बंदी घातली आहे. या तेलाद्वारे १ लाख ८० हजार बॅरल डिझेल उत्पादन केले जाऊ शकेल. यामुळे क्युबाची ९ ते १० दिवसांची दैनंदिन गरज भागवता येऊ शकेल, असा अंदाज आहे.
ट्रम्प प्रशासनाने (Donald Trump) अलिकडच्या काही महिन्यात क्युबाविरोधी भूमिका घेतली आहे. तेथील राजवट बदलण्याची गरज असल्याचे अमेरिकेने वारंवार म्हटले आहे. अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे क्युबामध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः गॅसोलाईन आणि प्राथमिक स्रोतांच्या तुटवड्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
उर्जा प्रकल्पांचा इंधन पुरवठा थांबल्यामुळे देशात अलिकडच्या काळात दोनवेळा ग्रीड फेल होण्याचा प्रकार घडला होता. पूर्वी व्हेनेझुएलाकडून क्युबाला इंधन पुरवठा केला जात होता. मात्र व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यापासून हा इंधन पुरवठा देखील थांबला आहे.






